अतिक्रमणग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले ‘माणुसकीचे हात’

0

शिख समाज, लिनेस क्लब व गुरू माँ  संघटनेने पिडितांना भरवले अन्नाचे घास

श्रीरामपूर / राजेंद्र उंडे 

             बुलडोझर फिरविल्यानंतर उघड्यावर पडलेल्या अतिक्रमणग्रस्त कुटुंबांला झोपायला तर सोडा अन्न शिजवायलादेखील जागा उरली नाही. सर्वांवरच उपासमारीची वेळ आली असताना प्रशासनापाठोपाठ सर्व लोकप्रतिनिधींनी देखील पाठ फिरवली. अशा अवस्थेत या सर्वांच्या मदतीला शहरातील ‘माणुसकीचे हात‘ मात्र सरसावले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत्त शहरातील शिख समाज, लिनेस क्लब व गुरू माँ संघटनेने सलग तीन दिवस जेवनाचे पॅकेट वाटून पिडितांना अन्नाचे घास भरवून माणुसकीचे दर्शन घडविले.

           

राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोठा फटका श्रीरामपुरातही बसला. या कारवाईने शहरातील हजारो व्यावसायीकांसोबत शेकडो कुटुंबांना अक्षरशः उघड्यावर आणले. गोंधवणी रोडची असंख्य कुटुंबे उद्धवस्त झाली. अचानक कोसळलेल्या या संकटात पिडितांना सावरण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. निवडणुक काळात आपली पोळी भाजण्यासाठी मतदारांच्या मागे फिरणारे, चमकोगिरी करणारे पुढाऱ्यांचे कार्यकर्तेही घरात दडी मारून बसले. यावेळी या पिडितांच्या मदतीला धावून आलेल्यांकडे पाहून अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची प्रचिती आली.

           

श्रीरामपूर येथील शिख समाजाच्यावतीने गुरूद्वारामध्ये लंगर चालवला जातो. या संकटाची माहिती मिळताच गुरूद्वारामधून पहिल्या व दुसऱ्या दिवशी हजाराच्या वर जेवणाचे पाकिटे पिडितांपर्यंत पोचविण्यात आली.कोरोणा काळातही सलग ४८ दिवस दरोज सुमारे ९०० लोकांना गुरूद्वारामधून जेवन दिले जात होते.रूग्णालये,मंदिराबाहेर बसणारे भिक्षूक, झोपडपट्टी वासिय अशा असंख्य ठिकाणी शिख समाजाचे असंख्य हात आजही राबतात.

          शहरातील लिनेस क्लब श्रीरामपूर, मैथिली यांच्यावतीनेही तिसऱ्या दिवशी ५० कुटुंबांना जेवन वितरित करण्यात आले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. विना गंगवाल, सचिव माधुरी सोनवणे, खजिनदार प्रिया धाडिवाल, डॉ. अर्चना सोमाणी, डॉ. अचला अग्रवाल, श्रद्धा मिरीकर, शिवाणी शहा, ओम नारंग, डॉ. निलेश गंगवाल आदी उपस्थित होते. या उपक्रमात लिनेसच्या सर्व सदस्यांसोबत माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, डॉ. रिमा गोसावी, डॉ. सपना करवा राणी पांडे आदींनी देखील आर्थिक भार उचलला.

‘माणुसकीची रेषा’ उंचावली

            गोंधवणी रोड येथे गुरू माँ म्हणून ओळख असलेल्या मुमताज शाह यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या संघटनेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेकडकर वसाहत, घरकूल वसाहत येथे राहणाऱ्या महिलांनी घरी स्वयंपाक करून अन्न पुरविले. स्वतः दारिद्र्य रेषेखाली जगत असलेल्या या महिलांच्या मदतीने ‘माणुसकीची रेषा‘ मात्र उंचावली. शासनाने या लोकांचा थोडा तरी विचार करायला हवा होता. त्याच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. त्यांच्यावर आलेल्या संकटाने आम्हा सर्व सदस्यांची मने हेलावली. म्हणूनच ‘फूल ना फुलाची पाकळी’ म्हणून हा उपक्रम हाती घेतला.

माधुरी सोनावणे, सचिव, लिनेस क्लब, श्रीरामपूर

          शिख धर्माचे संस्थाप गुरूनानक देवजी यांच्या शिकवणीनुसार गुरूद्वारा द्वारे लंगर चालवूण सर्व गरिब, गरजू लोकांना अन्नदान करण्याची परंपरा जगभरात राबविली जाते. कोणीही उपाशी राहू नये  म्हणून आमचा सतत प्रयत्न असतो. या उपक्रमात धर्मातील असंख्य अदृष्य हात मदत करीत असतात.

लकी सेठी, श्रीरामपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here