कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भव्य दांडिया स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय, नृत्य कलाविष्काराच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध कलाकार-नृत्यांगना मानसी नाईक सोमवार (दि.०७) रोजी या दांडिया स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने देण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. यावर्षी भव्य दिव्य स्वरूपात दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून लहान गट व मोठा गट अशा दोन गटात घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख स्वरुपात अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. दांडिया स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी सुप्रसिद्ध कलाकार-नृत्यांगना मानसी नाईक यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने सोमवार (दि.०७) रोजी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी सायंकाळी ७.०० वाजता दांडिया स्पर्धेचा खेळ रंगणार असून या दांडिया स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक उपस्थित राहणार असल्यामुळे दांडिया स्पर्धकांच्या उत्साहात अधिकच भर पडणार आहे. या कार्यक्रमासाठी व दांडिया स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.