आदिशक्ती सप्तश्रुंगीच्या पादुकांची कोपरगाव शहरात जंगी मिरवणूक

0

भाविकांची दर्शनाला उसळली गर्दी, चौकाचौकात झाला फुलांचा वर्षाव

कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांनी वणी गडावरून  आणलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे कोपरगाव शहरात गुरुवार (दि.०३) रोजी संत महतांच्या उपस्थितीत ढोल पथकांच्या गजरात, लेझीम व झांझ पथकाच्या तालात, भव्य दिव्य स्वरुपात आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या या भक्ती सोहळ्याला भाविकांची  मोठी गर्दी उसळल्याचे यावेळी दिसून आले. शहरातील चौकाचौकात भाविकांनी पादुकांवर फुलांचा वर्षाव करून असंख्य भाविकांनी आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

This image has an empty alt attribute; its file name is kolhe-1.jpg

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या मा. संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मागील वर्षापासून आ. आशुतोष काळे वणी गडावरून कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आणत आहेत. यावर्षी देखील या पादुकांचे  कोपरगावकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. या पादुकांची गुरुवार (दि.०३) रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ.आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी पालखी खांद्यावर घेवून पालखी मार्गस्थ झाली.

या जंगी मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यानीझांझ पथक, लेझीम पथक, गरबा नृत्य, महाकाली आणि राक्षसांचे द्वंद्व युद्ध नुत्याविष्कारातुन सादर करून तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. विद्यार्थिनींनी आदिशक्तीची विविध रूपे साकारून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जावून कोपरगाव शहर आदिशक्तीच्या भक्तीरसात न्हावून निघाले होते.यावेळी संपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे यांनी देखील झांझ पथकाच्या तालावर ठेका धरत लेझीम खेळण्याचा देखील आंनंद घेतला.

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पु. रमेशगिरीजी महाराज, परमपूज्य राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, परमपूज्य शिवानंदगिरीजी महाराज, परमपूज्य सार्थकानंदजी महाराज, परमपूज्य अशोकानंदजी महाराज, परमपूज्य श्री प्रेमानंदजी महाराज, ह.भ.प. राजगुरु महाराज आदी संत महंतांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत पादुकांची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. शहरातील भाविकांना दर्शनासाठी या पादुका नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम सुरु असलेल्या कृष्णाई मंगल कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर या पादुका मतदार संघातील भाविकांना पादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी वारी, कोकमठाण, ब्राम्हणगाव, उक्कडगाव,मायगाव देवी, पुणतांबा आदी गावातील देवी मंदिरात नेण्यात येणार असल्याची माहिती सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here