जयहिंदच्या वतीने आरोग्य चळवळ सुरू करणार
संगमनेर : सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो त्यातून हृदयविकार, कॅन्सर यांची संख्या वाढली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेतील आजारांची संख्या व मदत वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य ,शिक्षण व रोजगार हे मूलभूत अधिकार असून जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आरोग्य चळवळ सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त संगमनेर मध्ये माध्यमांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य हे खऱ्या अर्थाने आता प्रत्येकाचे मूलभूत अधिकार बनले आहे.प्रत्येक माणसाला चांगल्या शिक्षणाबरोबर, रोजगार आणि चांगले आरोग्य मिळाले पाहिजे. धावपळीमुळे प्रत्येक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मोठ्या आजाराला आमंत्रण देतो. सध्या भारतात कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका वाढला आहे.अगदी तरुणांमध्ये ही हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. हे चिंताजनक असून चांगला आहार व व्यायाम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.याबाबत जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यासह राज्यभरात आरोग्य चळवळ राबविण्यात येणार आहे. लहान मुलांना व्यायाम आणि चांगले आहाराच्या सवयी लावण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.याबरोबर केंद्र शासनाची राष्ट्रीय स्वास्थ्य योजना बंद असून ती तातडीने सुरू झाली पाहिजे. तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये आणखी आजारांचा समावेश झाला पाहिजे. या आजारांसाठीची मिळणारी मदत ही वाढली पाहिजे. जेणेकरून गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाला आजारांमध्ये मोठा दिलासा मिळेल.गरीब किंवा शेतकरी कुटुंबामध्ये एखादा अचानक आजार उद्भवला तर त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडून जाते. अशावेळी आजारामध्ये खऱ्या अर्थाने शासनाकडून मदत झाली पाहिजे याकरता आपण सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला आहे.रस्ते अपघात हाही मोठा चिंतेचा विषय असून जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या काळात ४७ हजार ७९३ अपघात झाले असून मागील दोन वर्षांमध्ये २७०८४ लोक अपघातातून मृत्युमुखी पडले आहेत. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी विशेष समिती तयार करून अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यासाठी काम झाले पाहिजे. सरकार महात्मा फुले योजनेसाठी इन्शुरन्स भरत आहे मात्र मोठ्या आजारांसाठी मिळणारी मदत कमी असल्याने त्या कुटुंबाची आर्थिक कुचंबना होते. हे टाळण्यासाठीआरोग्य दिनानिमित्त या सुविधा तातडीने होणे गरजेचे असल्याचेही डॉ.तांबे यांनी म्हटले आहे.