मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेला हरवून आशिया चषक जिंकला. कोलंबोत झालेल्या अंतिम सामन्यात सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेनं अक्षरश: शरणागती पत्कारल्याचं चित्र दिसलं. त्यांची अख्खी टीम 15.2 ओव्हरमध्ये 50 धावांतच गारद झाली.
सिराजनं एकट्यानं सहा विकेट्स काढल्या आणि लंकेची दाणादाण उडाली. मग विजयासाठी 51 धावांचं लक्ष भारतानं 6.1 ओव्हर्समध्ये अगदी आरामात पार केलं. भारतासाठी सलामीवीर इशान किशननं नाबाद 23 तर शुबमन गिलनं नाबाद 27 धावा केल्या.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या चार ओव्हरमध्येच त्यांचा निम्मा संघ माघारी परतला.
चौथ्या ओव्हरमध्ये सिराजचा लंकेला दणका
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद सिराजनं टाकलेली चौथी ओव्हर निर्णायक ठरली. त्या ओव्हरमध्ये सिराजनं चार विकेट्स काढल्या. खरंतर जसप्रीत बुमरानं सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल परेराला भोपळाही न फोडू देता बाद केलं होतं आणि भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. मग दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजनं बॉल हातात घेतला. त्या अख्ख्या ओव्हरमध्ये सिराजनं एकही रन दिली नाही, उलट कुशल मेंडिसला तीनदा चकवलं. पुढच्या ओव्हरमध्ये बुमरानंही केवळ एकच रन दिली.
श्रीलंकेवर दबाव वाढला, तेव्हा त्यांच्या डावात सिराजनं एका मागोमाग एक सुरुंग पेरले. चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर सिराजनं पथुम निशांकाला रविंद्र जाडेजाकरवू झेलबाद केलं. तिसऱ्या बॉलवर त्यानं सदिरा समरविक्रमाला पायचीत केलं. सिराजच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ईशान किशननं चरिता अशलांकाचा झेल टिपला. पाचव्या बॉलवर धनंजय डिसिल्वानं चौकार लगावला. पण सहाव्या चेंडूवर सिराजनं त्याला राहुलकरवी झेलबाद केलं.
सिराजच्या त्या ओव्हरनं श्रीलंकेचं कंबरडंच मोडलं आणि त्यांची टीम सावरू शकली नाही. सामन्यातल्या सहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सिराजनं दसुन शनाकाचा त्रिफळा उडवला. तर बाराव्या ओव्हरमध्ये त्यानं अखेर कुशल मेंडिसला माघारी धाडलं.
श्रीलंकेचा डाव संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, “हे स्वप्नासारखे आहे. गेल्यावेळी श्रीलंकेविरुद्ध मी चार विकेट घेतल्या होत्या. पण पाचवी विकेट घेऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जे काही तुमच्या नशिबात असतं, तेच तुम्हाला मिळतं. आज ते माझ्या नशिबात होतं, म्हणून मला ते मिळालं.”
सिराज पुढे म्हणाला, “आजच्या सामन्यांइतका स्विंग मला पूर्वीच्या सामन्यांमध्ये मिळाला नाही. मला फलंदाजांना खेळू द्यायचे होते. मला आऊटस्विंगर्ससह विकेट मिळाल्याचे खूप समाधान आहे. कारण सहसा अशा परिस्थितीत मला विकेट मिळत नाहीत.” सिराजशिवाय जसप्रीत बुमराहने एक, तर हार्दिक पांड्यानं 3 विकेट्स काढून भारताच्या विजयाची पायाभरणी केली.