आशुतोषला लई-लई मताधिक्य द्या, मी देखील लई-लई निधी देईल : अजितदादा पवार

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या इतिहासात लोकप्रतिनिधी म्हणून अनेक दिग्गजांनी काम केले परंतु कोपरगाव मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून सर्व लोकप्रतिनिधींच्या तुलनेत सर्वात जास्त निधी कोणी आणला असेल तर आ. आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटी निधी आणणे येड्या गबाळ्याचे काम नाही . मात्र २०१९ च्या निवडणुकीत आशुतोष काळेंना फार कमी मताधिक्य दिले. परंतु यावेळी मतदारांनी आशुतोषला लई-लई मताधिक्य द्या मी देखील लई-लई निधी देईल . अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावच्या मतदारांना आवाहन केले . कर्मवीर शंकररावजी काळे  व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या समवेत काम केले असून आशुतोष माझ्या सोबत काम करीत आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो मला काळे परिवाराच्या तीन पिढ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक कोपरगाव मतदार संघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व मतदार संघातील ३०० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आ. माणिकराव कोकाटे, आ.किशोर दराडे, मा.आ. नरेंद्र घुले, मा.आ. चंद्रशेखर घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले, मा. खा. सुजय विखे पा., मा. आ. भाऊसाहेब कांबळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे, डॉ.सौ.मेघनाताई देशमुख, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे, सिद्धार्थ मुरकुटे, उदयनदादा गडाख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रविण पाटील, अॅड.प्रमोद जगताप, आबासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना अजितदादा म्हणाले की, नगर जिल्ह्याला अनेक थोर नेते मिळाले हे जिल्ह्याचे भाग्य असून राज्याच्या ३६ जिल्ह्यात एवढ्या मोठ्या ताकदीचे नेते एकाही जिल्ह्याला मिळाले नाही. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक,सहकार, शैक्षणिक चळवळीच्या बाबतीत अतिशय जागरूक असणाऱ्या नगर जिल्ह्यात कर्मवीर शंकरराव काळे यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे पुढे चालवितांना मतदार संघाच्या विकासाला आकार देवून रखडलेले महत्वाचे विकासकामे पूर्ण केले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणीनुसार बेरजेचे राजकारण करतांना सर्वाना सोबत घेवून विकासकामांना निधी देतांना कधीही राजकारण न करता माजी आ.अशोकराव काळे यांना विकासकामांसाठी मदत केली असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी आवर्जून सांगितले.

मतदारसंघातील जनतेचे व काळे परिवाराच्या अलौकिक नात्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कौतुक केले. काळे परिवाराचा हा वारसा कर्मवीर शंकररावजी काळे यांचे नातू आ.आशुतोष काळे पुढे चालवत असून त्यांनी मागणी केली की, काही करा ज्याप्रमाणे मंत्रिमंडळाने विदर्भाला वरदान ठरणाऱ्या ८५ हजार कोटीच्या वैनगंगा-पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. त्याप्रमाणे पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नार पार योजना सारख्या प्रकल्पांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ७५ लाख कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचे अजितदादा यांनी सांगितले.

   सत्काराला उत्तर देतांना मा.आ.अशोकराव म्हणाले की, अभीष्टचिंतन सोहळा माझ्या ध्यानीमनी नव्हता कारण मी माझा वाढदिवस कधी साजराच केला नाही. मात्र ज्याप्रमाणे ना. अजितदादा आशुतोषचा हट्ट पूर्ण करतात त्याप्रमाणे मला देखील आशुतोषचा हट्ट व कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करावा लागला. राजकीय जीवनात २००४ साली कोपरगाव मतदार संघातील माझ्या असंख्य जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर व असंख्य शिवसैनिक व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निवडून आलो. माझ्या राजकीय जीवनात स्वत:च्या फायद्यासाठी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. जे काही केले, जे काही निर्णय घेतले ते समोर घेतले. बेगडी राजकारण कधीही केले नाही. जे पोटात तेच ओठात, जे आहे ते आहे, जे नाही ते नाहीच असा माझा स्वभाव. तोच स्वभाव अजितदादांचा असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे आणि माझे विचार जुळले आणि एकमेकांवरचा विश्वास वाढत जावून दहा वर्षात विरोधी पक्षाचा आमदार असूनही अजितदादांच्या सहकार्याने मतदार संघाचा विकास केला. २०१२ साली कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या निधनानंतर मोठा आधार गेल्याची भावना मनात निर्माण झाली असतांना त्यांच्या समवेत काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या काळात व आ.आशुतोष काळे यांना राजकीय व व्यक्तिगत जीवनात मोलाची दिलेली साथ आयुष्यात कधीही न विसरण्याजोगे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ.आशुतोष काळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा कामाचा व्याप पाहता बारामती मतदार संघ सोडला तर एक मतदार संघात दहा दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा ते कधीही गेले नाहीत मात्र कोपरगाव मतदार संघ या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्याला अपवाद ठरला. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांच्याकडून मला मिळालेल्या सहवासातून ‘दहा नको, दोनच पण जीवाचे कार्यकर्ते’ या विचारांवर काम करीत आलो. वडिलांच्या आग्रहास्तव २०१४ च्या निवडणुकीला सामोरे गेलो. दुर्दैवाने पराभव झाला. त्यानंतर आई वडिलांना आजाराला सामोरे जावे लागले.त्यावेळी मतदार संघातील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले,मोलाची साथ दिली एवढेच नव्हे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून देखील आणले. वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची वेळ देखील निश्चित केली होती परंतु ज्यांचा वाढदिवस करायचा त्यांनाच विचारलेले नव्हते.त्यांनी सांगितले होते की, वाढदिवस करायचा नाही. त्यामुळे ज्यावेळी त्यांना सांगितले की, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते वाढदिवस करायचा आहे त्यावेळी त्यांनी होकार दिल्यामुळे अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, पत्रकार व कोपरगाव मतदारसंघासह जिल्ह्याभरातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी आणि आशुतोष एकसंघ राहून जिल्ह्याचे प्रश्न सोडवू ——–

कोणताही कार्यक्रम वेळेवर सुरु होत नाही त्यामुळे कार्यक्रमाला जरा उशिरा पाहोचलो. मात्र ह्या अभीष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते असल्यामुळे वेळेत सुरु झाला कारण अजितदादा वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहेत याची अनुभूती संपूर्ण महाराष्ट्राला आलेली आहे आणि आज मला देखील आली. जिह्याचे व तालुक्याचे प्रश्न सोडविण्यात कर्मवीर शंकरराव काळे यांचे योगदान मोठे आहे. यापुढील काळात काळे-विखे परिवाराचे ऋणानुबंध कायम ठेवण्याची जबाबदारी माझी आणि आशुतोषची राहील. आम्ही दोघे मित्र म्हणून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकसंघ राहून काम करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here