जामखेड तालुका प्रतिनिधी :- जय भवानी सामाजिक सांस्कृतिक संस्था मागील १६ वर्षापासून साडेपाचशी कि. मी. सायकल रॅलीवरून केवळ देवदर्शनच करीत नाही तर निसर्ग व पर्यावरणाचा -हास होऊ नये याबाबत जनजागृती करून कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेऊन सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान या रॅलीत सहभागी असलेले दोन न्यायाधीश करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान सत्यवान डोके यांनी कायदेविषयक शिबीरात कार्यक्रमात केले.
जय भवानी सामाजिक सांस्कृतिक संस्था व गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने पिंपळगाव जलाल येथून निघालेली सायकल रॅली जामखेड येथे आली असता येथील विठाई कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व सत्कार समारंभ जामखेड विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके बोलत होते. यावेळी सायकल रॅलीत सहभागी असलेले गोंदियाचे दिवाणी न्यायाधीश विक्रम आव्हाड, हिंगणघाट (वर्धा) न्यायालयाचे न्यायाधीश बाळासाहेब पवार, जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक डिगांबर चव्हाण, अमित जाधव, वकील संघाचे अध्यक्ष संग्राम पोले, माजी अध्यक्ष हर्षल डोके व सदस्य, जय भवानी सामाजिक सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे व सायकल रॅलीत सहभागी स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायाधीश विक्रम आव्हाड म्हणाले, मागील १६ वर्षापासून जयभवानी सामाजिक सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल ते गांणगापूर हा ५५० कि. मी. प्रवास मी करीत आहे. मी त्यावेळी कायद्याचे शिक्षण घेत होतो व आता न्यायाधीश आहे. या सायकल यात्रेत सुरवातीला आम्ही संस्थेचे अध्यक्ष व मी असे दोघेच होतो. तेव्हा निसर्ग व पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याबाबत गावोगावी आम्ही सायकलवरून प्रवास करून मार्गदर्शन करीत होतो आता न्यायाधीश असल्याने गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने प्रवासातील सहा मुक्कामी कायदेशीर मार्गदर्शन शिबीर घेऊन त्यात विविध विषयांवर माहिती सर्वसामान्य नागरिकांना देत आहोत.
यावेळी जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप, हिंगणघाट न्यायालयाचे न्यायाधीश बाळासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. प्रविण ससाणे यांनी केले तर आभार अँड. नीतीन घुमरे व अँड. कृष्णा शिरोळे यांनी मानले.