कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे मौजे मोर्विस (धामोरी फाटा) ता. कोपरगांव येथील उपबाजारास शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती बाजारसमितीचे सभापती साहेबराव रोहम आणि उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली आहे. बाजार समितीद्वारे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रात रवंदे, मोर्विस, धामोरी, चास, कोळपेवाडी या २० ते २५ गावांच्या परिसरात कांदा, भुसार व टोमॅटो या शेतीमालाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. परंतु तेथील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी जवळ बाजारपेठ नसल्यामळे त्यांना २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्केटवर जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुक खर्च वाढून वेळही वाया जातो. याचा गैरफायदा घेऊन बाहेरील व्यापारी सोयाबीन, गहु, मका, कांदा काढण्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या वजनमापात १ ते २ किलोचा नियमबाहय काटला घेतात. शेतक-यांची भावात व पेमेंटमध्ये बऱ्याच वेळा फसवणुक केली जाते.
यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीस आणण्यासाठी अंतर कमी होवुन त्यांच्या वेळेत व खर्चात बचत होईल . तसेच परिसरातील शेतमाल खरेदी विक्रीचे अनधीकृत व्यवहारास प्रतीबंध बसेल. मौजे मोविंस (धामोरी फाटा) उपबाजाराचे ठिकाण हायवे लगत असल्याने उपबाजारामध्ये शेतकऱ्यांना शोतमाल आणणे सोईचे होईल. शेतकऱ्यांची उपबाजार सुरू करण्याची मागणी पुर्ण झालेली असुन याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. यामुळे परिसरातील शोतक-यांचा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल.
सदर उपबाजार आवाराचे उद्घाटन लवकरात लवकर होणार आहे. उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) ता. कोपरगांव या ठिकाणी बाजार समितीला कांदा, भुसार व टोमॅटो या शेतीमालाचे लिलावाचे कामकाज सुरू करायचे असुनम खरेदीदार व आडते व्यापारी यांना व्यापाराच्या परवान्यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्तीनुसार नविन आडते व खरेदीदारासाठी लायसेन्स द्यावयाचे असुन त्यासाठी इच्छुक / उत्सुक असणा-या व्यापारी बांधवांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव ता. कोपरगांव जि. अहिल्यानगरच्या मुख्य कार्यालयात नवीन लायसेन्स मिळणे बाबत लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.