कोळपेवाडी वार्ताहर – ५ नंबर साठवण तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी निश्चिंत रहावे तुम्ही नियमित पाणी मिळण्याचे पाहिलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगावच्या नागरिकांची विशेषतः महिला भगिनींनी मागील अनेक वर्षापासुनची होत असलेली ससेहोलपट कायमची थांबावी यासाठी सत्ता नसतांना देखील माझे प्रयत्न सुरू होते. ५ नंबर साठवण तलावासाठी येणारा खर्च कमीत कमी करण्यासाठी साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करून घेतले त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेचे जवळपास सहा कोटी रुपये वाचविले आहेत.
पुढील कामाला लवकरात लवकर सुरूवात व्हावी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केल्यामुळे ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मिळविण्यात यश मिळाले त्यामुळे खऱ्या अर्थाने साठवण तलावाच्या कामाला गती मिळाली आहे. परंतु साठवण तलावाला निधी मंजूर करतांना १५ टक्के निधी हा कोपरगाव नगरपरिषदेला भरणे अनिवार्य होते.अर्थात हा निधी कोपरगावकरांच्या करातून जाणार होता. परंतु १५ टक्के म्हणजे जवळपास २० कोटीच्या आसपास एवढी मोठी रक्कम भरण्याची कोपरगाव नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती.मात्र ही अडचण देखील दूर करून हा १५ टक्याचा बोजा कोपरगाव करांवर पडू द्यायचा नाही यासाठी पाठपुरावा सुरू होता.त्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून या १५ टक्के निधीची रक्कम देखील आपल्याला दिल्यामुळे पुन्हा एकदा कोपरगाव नगर परिषदेचे १९ कोटी ६८ लाख ६० हजार रुपये वाचले आहे.साठवण तलावाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.
आजपर्यंत ५ नंबर साठवण तलावाचे ४० टक्क्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून पुढील काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून येणाऱ्या काही महिन्यात उर्वरित काम देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोपरगावकरांनी मागील अनेक वर्षापासून पाहिलेलं नियमित स्वच्छ पाणी मिळण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे त्याबाबत कोपरगावकरांनी निश्चिंत रहावे असे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.