कोपरगावात भाजपच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

कोपरगाव : कोपरगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका शिल्पाताई रोहमारे, विद्याताई सोनवणे, मंगलताई आढाव, दीपाताई गिरमे, हर्षाताई कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब आढाव, दिनेश कांबळे, राजेंद्र बागुल, सतीश रानोडे, गोपीनाथ गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. 

भारताला समृद्ध बनविण्यासाठी अनेक स्त्रियांनी आपले सर्वस्व व कर्तृत्व पणाला लावले. त्यात संत परंपरेतील स्त्रिया जशा आहेत, तशाच राष्ट्रीय व  ऐतिहासिक परंपरेतील लढाऊ स्त्रियाही होऊन गेल्या. राजमाता जिजाऊ हे या दुसऱ्या प्रवाहातील एक ठळक नाव आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी  हजारो वर्षांची सिंधूबंदी, स्त्री स्वातंत्र्यबंदी तोडली व आपल्या सुपुत्रामार्फत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. म्हणूनच जिजाऊ माँसाहेब या भारतीय स्वातंत्र्याच्या आद्य जननी आहेत, असे म्हणता येईल. जिजाऊ माँसाहेब  स्वाभिमानी, धाडसी, दृढनिश्चयी, शिस्त व न्यायप्रिय होत्या. जात-धर्म यापलीकडे जाऊन त्या रयतेचा विचार करणाऱ्या होत्या. सासर आणि माहेर दोन्ही घरात निर्माण झालेल्या शत्रुत्वाने दुःखाने होरपळलेली व संकटांशी सामना करीत सतत उभी असलेली एक महत्त्वाकांक्षी बाणेदार वीरांगना होती. जिजाऊ माँसाहेब श्रद्धाळू होत्या; पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. त्यांनी शिवरायांना आत्मविश्‍वास दिला. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या व पुढे घडलेल्या सर्व कार्यात जिजाऊंचा निव्वळ पाठिंबा व आशीर्वाद नव्हता, तर कृतिशील असे धोरण होते.

माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाऊ माँसाहेब यांचे असावे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेचे बीज त्यांनीच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. ‘तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे’, असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच त्या दृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या माँ जिजाऊ यांचा लढा हा अखंड मानव जातीसाठी, शोषकांच्या विरोधात शोषितांच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा होता. मुळे आईकडून सदाचार व प्रेमाचा,संस्कारांच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत गोर गरीबांच्या कल्यानांचे कार्य करणारे शिवराय स्वराज्यसिंहासनावर अधिष्ठित होऊन जनता सुखी रहावी यासाठी अविरतपने माँसाहेब जिजाऊ लढत राहिल्या, असे विचार भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here