संगमनेर : संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने आद्य गुरु शंकराचार्य यांची जयंती व समाज रत्न पुरस्कार सोहळा खांडगाव येथील खांडेश्वर मंदिर परिसरात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी रामगिरी गोसावी होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्याचे संचालक रमेश लहानुभाऊ पा.गुंजाळ व महंत दयानंद गिरी महाराज होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य गुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गोसावी समाजाचा अद्ययावत पूजा विधि ॲप तयार केल्याबद्दल डॉ.सुरेश गणपत भारती यांना संगमनेर समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी नवनियुक्त संचालकांना नियुक्तीपत्र, गुलाबपुष्प व समाजाची डायरी देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.
रमेश गुंजाळ यावेळी म्हणाले की,गोसावी समाज हा एक वैचारिक, धार्मिक, अध्यात्मिक वृत्तीचा आहे. प्रत्येक गावात या समाजाला चांगल्या प्रकारचे मानाचे स्थान आहे. आद्य गुरु शंकराचार्य हे सर्व धर्माचे सर्वोच्च गुरु आहेत. आपल्या गोसावी समाजाने संघटित होऊन अनेक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.सुरेश भारती यांनी यावेळी बोलताना सांगितले की, दशनाम गोसावी समाजाची पूजा ॲप तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजाची एक पूजा विधि असावी, पूजा करता यावी, समाजातील मुलांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्याचे त्यांनी आश्वासन दिले तसेच समाजासाठी वेग वेगळे सॉफ्टवेअर आणि ॲप तयार करण्यासंदर्भात नेहमी सहकार्य असेल अशी भावना व्यक्त केली.
यावेळी कैलास शंकर गोसावी, भास्कर गोसावी, अर्जुन गोसावी, चंद्रकांत गोसावी, शरद गिरी, बाळासाहेब गोसावी , गणपत भारती,उल्हास गोसावी, भागवत शिवबाळ भारती, संतोष पुरी , सोमनाथ गोसावी, राजाराम गोसावी , चंदन गोसावी, प्रवीण गोसावी, माधव पुरी, यांच्यासहित सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व संगमनेर तालुक्यातील तमाम गोसावी बंधू-भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप गोसावी यांनी तर आभार सोमनाथ बाळगीर गोसावी यांनी मानले.