संगमनेर : कुठलीही घटना घडली नसतानाही एका वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी चौघांवर गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा दाखल केल्याने या विरोधात (दि. २६) गणराज्य दिनापासून शहर पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा पत्रकार विनोद पारधे यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही आमच्या शेत जमिनीत पोल लावत असताना कमल मारुती दारोळे व संजय मारुती दारोळे यांनी येऊन आम्हालाच शिवीगाळ केली. व १७ नोव्हेंबर रोजी रात्री आम्ही शेतात लावलेले पोळ कमल दारोळे, संजय दारोळे, आकाश दारोळे, मंगल दारोळे यांनी अन्य लोकांना रिक्षात घेऊन येत पोल तोडून टाकले. आमची फिर्याद न घेता कमल दारोळे यांच्या खोट्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी विनोद नानासाहेब पारधे, भारत नानासाहेब पारधे, बिल्डर योगेश निवृत्ती भालेराव, अमर धनराज अशा चौघांवर गु. र. नं. ८९६ भादंवि कलम ३२३, ३२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे चौघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी खोटे २ अदखलपात्र गुन्हे देखील आमच्यावर दाखल केले आहेत. कुठलीही घटना घडली नसताना आमच्यावर खोटे गुन्हे लादले जात आहेत. आम्ही फिर्याद देण्यासाठी गेलो, मात्र पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. उलट आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. कमल दारोळेचा मुलगा संजय दारोळे याच्यावर शहर पोलिसात गु. र. नं ५०/१५ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. त्याने आईला पुढे करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. पोलिस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचे या घटनेवरून पुढे आले आहे. आम्ही सर्व साक्षीदार सादर करूनही पोलिस दबाव टाकत आहेत. तरी कमल मारुती दारोळे, संजय मारुती दारोळे, आकाश संजय दारोळे, मंगल संजय दारोळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कारवाई करावी. तोडलेल्या पोलची नुकसान भरपाई मिळवून द्यावी. पोलिस उपनिरीक्षक बारकू जाणे दबाव टाकून चुकीची कारवाई करत असल्याने यांच्यावरही कारवाई व्हावी. शहर पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा या विरोधात गणराज्य दिनापासून परिवारासह शहर पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार विनोद पारधे यांनी निवेदनातून म्हटले आहे.