आरोपी फरार पोलीस घेताहेत शोध
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी नगदवाडी परिसरात अवैद्य धंदे, विद्युत मोटारींच्या चोऱ्या व गावगुंडांची दहशत यामुळे नागरिक भयभीत झाली असून दहशत माजवणाऱ्या आरोपी विरोधात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपींचा तपास लावून त्यांना अटक करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सापळा रचला आहे. मात्र दोन दिवसापासून हे आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींचा शोध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री चौधरी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे घेत आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील सरपंच शकुंतलाताई गुडघे व त्यांचे पती निरंजन गुडघे यांना रात्री तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी निरंजन गुडघे यांना शिवीगाळ केली. हातात लोखंडी राँड व दांडके फिरवत बिरोबा मंदिराकडे ये तिथे तुझ्याकडे बघतो असा दम दिला. रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली असल्याने फिर्यादी घाबरून गेले. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या शेजाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. विरभद्र बिरोबा मंदिर परिसरात येथे आरोपी दारू पिऊन गावाला व सरपंचांना शिवीगाळ करू लागले. रात्री शिर्डी साईबाबा संस्थान वरून आपली ड्युटी करून आलेले सिक्युरिटी ऑफिसर विजय गुडघे यांनी आरोपींना समजावून सांगत घरी जाण्याचे सांगितले. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी शिवीगाळ करणे थांबवले नाही.विजय गुडघे व ग्रामस्थांनी यावेळी मध्यस्थी करत निरंजन गुडघे यांची सुटका केली. ही सर्व घटना पोलीस पाटील दगू गुडघे यांच्या समक्ष घडली. सदर घटनेची माहिती त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली. रात्री उशिरा कोपरगाव पोलीस स्टेशन गाठत निरंजन गुडघे यांनी आरोपी विजय सुभाष खोमणे, योगेश विठ्ठल वर्पे व दीपक सुभाष खोमणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. रात्री साडेअकरा वाजता सरपंच शकुंतला गुडघे यांच्या घरी येत नगदवाडी परिसरात पाणी का आले नाही.
याबाबत आरोपींनी त्यांना विचारले तेव्हा निरंजन गुडघे यांनी सांगितले की ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व गावात पाणी येत आहे आता तुम्ही पिलेले आहेत उद्या सकाळी बघू मात्र याचा राग येत त्यांनी फिर्यादीला व सरपंच यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. सरपंच गुडघे यांना इथे बोलवा त्यांना जीवे मारू असा दमही त्यांनी दिला.रात्रीच्या या प्रकरणाने गावात दहशत निर्माण झाली. गावात येण्याअगोदर नगदवाडी येथे आपल्या मित्रांसोबत बसलेला असलेल्या आदित्य गणेश माळी वय 15 वर्ष यालाही काही कारण नसताना वरील आरोपींनी बेदाम मारहाण केली. सुनिता गणेश माळी आपल्या मुलाला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत दमबाजी केली. यामुळे सरपंच गुडघे यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.
गणेश कैलास माळी यांनी या आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपींच्या अडून जर कोणी त्रास देत असेल तर त्याचाही बंदोबस्त केला जाईल असे सोनेवाडीच्या नागरिकांना धीर देताना पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले.
रात्री घटना घडल्यानंतर वरील आरोपी पुन्हा सकाळी गावात मोटरसायकलवर येत गावाला चक्कर मारत आपली दहशत कायम ठेवली. रात्री मध्यस्थी करणाऱ्या विजय गुडघे यांना टार्गेट करत त्यांनी शिर्डीहुन येत असताना त्यांच्यावर पाळत ठेवली. मात्र ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी विजय गुडघे यांना शिर्डीहून ग्रामस्थांच्या उपस्थितीत घरी आणले. मात्र या गुन्हेगारांची अशी दहशत जर वाढली तर गावाला मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक चौधरी व त्यांची टीम देखील सोनेवाडीत दाखल झाली होती मात्र आरोपीने तिथून पळ काढल्यामुळे त्यांच्या हाताला ते लागले नाही.