ज्ञानसरिता विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
अहमदनगर ( प्रतिनिधी) – प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूलाअनन्य साधारण महत्व आहे, गुरुमुळे प्रत्येक व्यक्ती घडत असतो. त्यामुळे आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आई वडिलांना आपल्याकडून अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सचिव सुनील गोसावी यांनी केले. ज्ञानसरिता विद्यालय व उच्य माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्ञानसरिता विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले. विविध क्षेत्रात या विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या वरून विद्यालयाचे शिक्षकांनी घेतलेली मेहनत दिसून येते. देशाचे भवितव्य हे खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या हाती असून विद्यार्थ्यांनी नेहमी ज्ञानार्थी राहायला हवे.
याप्रसंगी उद्योजिका अपूर्वा तोरडमल, स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच विजय शेवाळे,प्रा.शिवाजी घाडगे, संस्थेचे अध्यक्ष जालिंदर डोंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण शिंदे, रघुनाथ शेजवळ, बाळासाहेब डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश डोंगरे व दिलीप गव्हाणे, संचालक अशोक शेवाळे,मा.ग्रा. स. दीपक शिंदे, सुनील शेवाळे, मा. ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य हुसेन सय्यद, नामदेव चांदणे, ओंकार शिर्के, डॉ. बापू पवार, सोसायटीचे व्हा.चेअरमन बाळासाहेब डोंगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी इशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य बाळकृष्ण सानप यांनी केले. सुरेखा घोलप व संजय कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कनिष्ठ महावद्यालय विभाग प्रमुख प्रा.आयनुल शेख यांनी आभार मानले. वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.