कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे तसेच संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन व कॉक हाऊस डे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. रईसा शेख यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे व सौ.सुशिलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गौतम पब्लिक स्कूलचे सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, राज्यातील विविध स्पर्धा जिंकणारे गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी यांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य नूर शेख यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा यासाठी वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी घेण्यात आलेल्या इंटर हाऊसेस स्पर्धां अंतर्गत मैदानी तसेच अमैदानी खेळांच्या एकूण बारा स्पर्धा घेण्यात आल्या. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या एकूण ४८ गुणांच्या स्पर्धांमध्ये ऑरेंज हाऊसने३३ गुणांची कमाई करून कॉक हाऊस खिताब पटकावला. यावेळी ऑरेंजचे हाऊस मास्टर नासीर पठाण यांचे प्रमुख अतिथी व प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सन्मान करण्यात येवून सर्व सदस्य शिक्षक यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यामध्ये ग्रीन हाऊस ३१, येलो हाऊस ३० व ब्ल्यू हाऊस २६ गुणांसह अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकावर राहिले. पालक भेटीच्या औचित्यावर आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन तसेच कॉक हाऊस डे कार्यक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यांचे पालक आपआपल्या पाल्यांच्या हाऊस रंगातील वेशभूषेत मोठ्या संख्येने हजर होते.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गौतमच्या कलाकारांनी आपले नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गौतमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून उपस्थित पालकांना काहीसे भावनात्मक केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात गौतमच्या बाल वैज्ञानिकांनी तयार केलेले विविध उपकरणे व कलाकारांनी रेखाटलेले विविध चित्रांनी युक्त असे गणित-विज्ञान प्रदर्शन व आर्ट गॅलरीचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकांनी उस्फूर्तपणे आपले म्हणणे मांडत गौतम पब्लिक स्कूल प्रशासन, प्राचार्य नूर शेख व शिक्षक वृंद यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली भूमिका चोखपणेपार पाडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा जाधव व कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक व अहवाल वाचन पर्यवेक्षिका ज्योती शेलार तसेच आभार प्राथमिक विभाग पर्यवेक्षक राजेंद्र आढाव यांनी मानले.
गौतम पब्लिक स्कूलचे नियोजन अप्रतिम असल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे व सचिव सौ. चैतालीताई काळे यांचे उपस्थित पालकांनी कौतुक केल. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रात अव्वल असणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी विविध ठिकाणी उच्चपदावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणारी शाळा असा गौतम पब्लिक स्कूलचा नावलौकिक असल्यामुळे गौतममध्ये प्रवेश मिळावा यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची इच्छा असते. परंतु विद्यार्थी क्षमता पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे प्रवेशासाठी येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा अशा अपेक्षा पालकांनी व्यक्त केल्या.