ग्रामपंचायत निवडणूकीत आश्वासनाचा वारु चौफेर उधळाला..!

0

विकास म्हणजे काय रे भाऊ हे सांगायला मात्र कोणीही पुढे येईना

संगमनेर : चंद्रकांत शिंदे 

संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आश्वासनाची खैरात केली जात असून ठोस ग्रामविकासाची ब्ल्यू प्रिंट कोणाकडेही नसल्याने केवळ आश्वासनाचे चॉकलेट देऊन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सर्व पक्षीयांकडून  सुरू आहे. एकूणच या प्रचाराचे फलित काय तर केवळ आश्वासनाचा वारू चौफेर उधळल्याचे विदारक चित्र संगमनेर तालुक्यातील निवडणुका होत असणाऱ्या गावात ठळकपणे दिसते आहे. विकास म्हणजे काय रे भाऊ हे सांगायला मात्र कोणताही उमेदवार अथवा त्यांचा कार्यकर्ता पुढे येत नाही. त्यामुळे येणारी पाच वर्षे ग्रामविकासाच्या दृष्टीने कशी असतील या चिंतेत ३७ गावातील मतदार राजा पडला आहे.

           तालुक्यातील ३७ गावात ग्रामपंचायतच्या निवडणुका येत्या रविवारी १८ डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकांचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आज दिवसभर या ३७ गावात मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. सर्व पक्षांकडून अनेक गावात उमेदवारी देताना मतांची गोळा बेरीज करून दिलेला उमेदवार निवडून कसा येऊ शकतो, एवढाच निकष लावलेला दिसतो. अनेक ठिकाणी अशिक्षित उमेदवार सर्वपक्षीय नेतृत्वाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अनेकांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. पंचायत समितीमध्ये किती विभाग आहेत, जिल्हा परिषदेत किती विभाग आहे, ग्रामविकासाचे काम करताना कोणाकोणाला भेटावे लागते असे प्रश्न विचारल्यावर निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांची भंबेरी उडत आहे. त्यामुळे हे गावचा विकास कसा साधणार असा प्रश्न सुज्ञ मतदारांना पडला आहे.  विकास म्हणजे काय रे भाऊ हे सांगायला मात्र कोणताही उमेदवार अथवा कार्यकर्ता पुढे येत नसल्यामुळे मतदारानीच आता घुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवाराना समाजमाध्यमावर प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता तरी, हे उमेदवार विकासाच गमक मतदाराना समजून सांगतील का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणूकीत अनेक ठिकाणी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी एकमेकाविरुध्द दंड थोपटले असून दोन्ही गटाचे कार्यकर्ते पायाला भिगंरी लावुन प्रचार करत आहेत. ‘डोअर टू डोर’ भेटीगाठीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी जोर दिला आहे. मतदाराच्या कॉर्नर बैठका व प्रचार सभा यामध्ये नेमका आपण विकास काय करणार ? हे सांगायला उमेदवार व कार्यकर्ते कमी पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार आता या उमेदवाराची फिरकी घेताना दिसत असून समाज माध्यमात पोस्ट टाकून प्रश्न विचारताना दिसत आहे. समाज माध्यमावर एका सुज्ञ मतदाराने निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांना खालील पोस्टद्वारे प्रश्न विचारले आहेत. ती पोस्ट खालीलप्रमाणे..! गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेले सर्वच उमेदवारांना नम्र विनंती आहे की आपण निवडून आल्यास पाच वर्षात काय काय गावाच्या समस्या दूर कराल ? कोणत्या विकास योजना पूर्ण करणार हे सर्व आम्हा मतदारांना व जनतेला सांगावे ही आपणास नम्र विनंती.“हे यामुळे लिहीत आहे की असे नको व्हायला की निवडून आल्यावर आपण म्हणायचे की जनतेने आम्हाला हे विचारलेच नव्हते.त्यामुळे आधीच विचारत आहे. आपणाला निवडून दिल्यास आपण गावासाठी काय कामे कराल ? आपण रेकॉर्डिंग करून पाठवा, व्हिडिओ बनवून पाठवा, लिहून पाठवा किंवा मग गावात बॅनर लाऊन सांगा. आपल्या जाहीरनाम्याची आम्ही वाट बघत आहोत.दरम्यान वरील पोस्ट समाज माध्यमावर तुफान वायरल होत असल्याने आता तरी प्रचारा दरम्यान आश्वासनाचा वारु चौफेर उधळणारे उमेदवार व कार्यकर्ते स्पष्ट शब्दात त्या गावात नेमक्या कोणत्या विकासाच्या योजना अथवा विकास म्हणजे नेमक काय  हे मतदाराना सांगतील का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here