“जगात तुच्छ असं काहीच नाही, फक्त त्यासाठी नजर हवी”– ज्येष्ठ गजलकार . प्रदीप निफाडकर.

0

(कै सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा फिरता स्मृती करंडक अहमदनगरच्या उशीर महेश व डमाळे अनिकेत यांनी पटकावला…….)

कोपरगाव -“जगात तुच्छ असं काहीच नाही. शूद्र वाटणाऱ्या बाबींतूनही सोनं निर्माण होऊ शकतं. हा कृतीसंदेश देण्याचे काम शिक्षकाचे आहे. शिक्षण व्यवस्थेची आज दुरावस्था होऊन ती धोक्यात आली आहे.मात्र शिक्षक, पालक व विद्यार्थी या महत्त्वाच्या घटकांनी आपापली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्यास शिक्षण व्यवस्था निश्चितच पुढे जाईल.” असे प्रतिपादन पुणे येथील पत्रकार व ज्येष्ठ गझलकार श्री.प्रदीप निफाडकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी भूषविले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम कॉलेजचा वार्षिक पारितोषिक व कै.सौ. सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतरमहाविद्यालयीन  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निफाडकर बोलत होते. आपल्या भाषणात निफाडकर पुढे म्हणाले की, वक्तृत्व महत्त्वाचेच आहे. ते प्रत्येकाकडे  असायला हवे. पण त्याचबरोबर संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे, “बोले तैसा चाले” ही वृत्तीही  हवी. आज जवळजवळ सर्व क्षेत्रात नको त्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होत आहे. खरे बोलावे की नाही,असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे.पण, शहाणा माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो. हे सांगताना त्यांनी, महात्मा गांधी, मार्क ट्वेन, तत्त्वज्ञ सॉक्रेटिस, क्रांतिवीर भगतसिंग, व्यंगचित्रकार आर. के.लक्ष्मण अशा अनेकांची प्रसंगयुक्त उदाहरणे दिली. याद्वारे, ज्याला जे व जेवढे पेलेल तेव्हढं शिक्षकांनी द्यावं आणि कुठं जायचं नाही,हे विद्यार्थ्यांनीही समजून घ्यावं. पालकांनीही उच्च ध्येयापर्यंत जाण्यासाठी पाल्यांना पाठबळ द्यावं.अशी मौलिक सूचनाही त्यांनी यावेळी केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सांगितले की,”रयतमधील पदे ही मानापानाची नाही; तर सेवेची आहेत. याची जाणीव सर्वांनी ठेवावी. शाहू ,फुले आणि कर्मवीरांचा महाराष्ट्र हे केवळ बोलण्यापुरते राहू नये.असा प्रयत्न गझल लेखनातून करून प्रदीप निफाडकरांनी सामान्य माणसांचेही विचार सर्वपरिचित करण्याचे कार्य केले. कवितेचा अर्थ गाण्यापेक्षा वाचण्यातून अधिक कळतो, हा अनुभव मला निफाडकरांना वाचण्यातून आला.” याप्रसंगी ॲड.शिंदे यांनी गुणवंत व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व सेवकांचेही अभिनंदन केले.

कर्मवीर भाऊराव पाटील आणि कै.सुशीलाबाई (माई) व कै.शंकरराव काळे यांच्या प्रतिमा पूजनानंतर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ आर .आर .सानप यांनी केले. तर डॉ.अर्जुन भागवत यांनी अहवालाचे वाचन करून महाविद्यालयीन प्रगतीचा आलेख मांडला.

यानंतर कै. सुशिलाबाई शंकरराव काळे (माई )आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा प्रा. हिंगे यांनी केली.यानुसार प्रथम क्रमांक- पाटील प्रणाली बेलापूर., द्वितीय क्रमांक- अन्वी जाधव,  माजलगाव., तृतीय क्रमांक- कवडे रोहन, पुणे., उत्तेजनार्थ पारितोषिके- केंद्रे तेजस्वी, अकलूज. खटकाळे पूजा, कोपरगाव.,पवार गायत्री,कोपरगाव., याप्रमाणे देण्यात आली. तर अहमदनगर येथील उशीर महेश आणि डमाळे अनिकेत यांना ‘फिरता-स्मृती करंडक’ सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.

गुणवंत प्राध्यापकांमध्ये डॉ.भगत घनश्याम, डॉ.विलास जीवतोडे, डॉ. विशाल पवार, (पीएच.डी.पदवी प्राप्त ) प्रा.प्रसाद अंकिता,डॉ.वर्पे संदीप (सेट परीक्षा उत्तीर्ण), डॉ.दयानंद सूर्यवंशी (प्राध्यापक पदी निवड), डॉ.बाबासाहेब वर्पे, डॉ. अर्जुन भागवत (पुणे विद्यापीठ,अभ्यास मंडळावर निवड),डॉ. मोहनराव  सांगळे, डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा. बाबासाहेब वाघ (कार्यगौरव पुरस्कार ) प्रा.किरण पवार,(संदर्भ ग्रंथ निवड)  प्रा.अमोल चंदनशिवे,(पर्यावरण मंडळ राज्य संघटक पदी नियुक्ती) प्रा.डॉ.देविदास रणधीर , दुशिंग दिलीप(आदर्श सेवक पुरस्कार) यांचा अशा विविध कारणे सन्मान करण्यात आला.

यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक विभागामध्ये विविधप्रसंगी यश प्राप्त केलेल्या आणि आपापल्या वर्गात प्रथम आलेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आमदार व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष  मा. आशुतोषदादा काळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माजी आमदार मा. अशोकदादा काळे,व बिपिनदादा कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.सौ.चैतालीताई काळे व विवेक कोल्हे यांनी हार्दिक सदिच्छा पाठविल्या. सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य पद्माकांत कुदळे, मच्छिंद्र रोहमारे,अरुण चंद्रे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले व धुमाळ साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here