संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
ज्या वेळी आणीबाणीच्या काळात संघावरती निष्कारण संकट होत,संघाकडे बघण्याची दृष्टी ही क्रोधाची,द्वेशाची होती अशा कालखंडामध्ये लोक संघापासून दूर जात होते किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्या कालखंडामध्ये अशोकराव सराफ संघामध्ये निष्ठेने कार्यरत होते असे गौरवोद्गार स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुरेश तथा भैयाजी जोशी यांनी काढले.
बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले माजी तालुका संघचालक अशोक सराफ यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्ताने त्यांचा गौरव व कृतज्ञता सोहळा संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे अशोकराव सराफ गौरव समितीच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पच्छिम महाराष्ट्राचे संघचालक सुरेश तथा नाना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. या वेळी अनेक मान्यवरांनी अशोक सराफांवर स्तुतीसुमने उधळीत त्यांच्या सोबतच्या जुन्याआठवणींना उजाळा दिला. भैय्याजी जोशी पुढे म्हणाले की अनुकूल वातावरणामध्ये सगळेच सामजिक कामासाठी उभे राहतात परंतु प्रतिकूल वातावरणामध्ये वय जरी कमी असले तरी सुद्धा परिसराचा अंदाज येवू शकतो इतकी जाणीव नक्की असते आणि म्हणून अशा परिस्थिती मध्ये चालायला सुरवात केली आणि जवळ जवळ आयुष्याचे सत्तर वर्ष एकाच विषयाशी स्वत: ला बांधून ठेवले. कोणताही कालखंड अशोकरावांच्या जीवनामध्ये सामाजिक कामाच्या संदर्भात निष्क्रिय राहिला नसेल असे मला वाटते.अशोकरावांचे जीवन बघितले तर संपूर्ण शुद्धतेचे दर्शन यात होते. असे गौरोवोद्गार देखील भैय्याजी जोशी यांनी यावेळी काढले. संघाविषयी बोलताना त्यांंनी सांगितले की,संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक प्रकारचे कष्ट,अपमान,हाल, अपेष्टा सहन केल्या, कित्तेक लोकांच्या नोकर्या गेल्या,घरातील माणसे मारली गेली,उघड्या डोळ्यांनी संसार उघडे झालेले पाहिले. इथे जमलेल्या बर्याच मंडळींनी १९७५ ते १९७७ चा आणीबाणीचा काळ बघितलेला आहे,इतक्या प्रकारच्या अनिच्छतेच्या वातावरणामध्ये हजारो कार्यकर्ते जेल मध्ये होते,अशोकराव पण तेव्हा जेल मध्ये होते. त्यावेळी ध्येयनिष्ट शक्तीच दर्शन झालं, या सर्वांमध्ये एकही कार्यकर्ता,स्वयंसेवक असा निघाला नाही की तो म्हणेल की मी संघाच काम करणार नाही. हा संघ आहे,हे संघाचे विचार आहेत.आता पर्यंतच्या प्रवासात संघाने या देशात सर्वात मोठी शक्ती उभी केली आहे, त्याचे नाव स्वयंसेवक आहे. यावेळी
संगमनेर मधील सर्व नागरिकांच्या वतीने सत्कार स्वीकारत उत्सवमूर्ती अशोकराव सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा सत्कार माझा नसून,हा सत्कार इतक्या वर्ष केलेल्या संघाच्या कामाचा,संघाच्या विचाराचा,संघाच्या संस्काराचा आहे मी फक्त त्याला एक निमित्त मात्र आहे.
अशा शब्दात आपले भावनिक मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर नगर जिल्ह्यातील ७५वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ स्वयंसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ.सोमनाथ सातपुते यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अच्चुत कुलकर्णी यांनी करून दिला. अशोक सराफ यांच्या विषयी गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी,भाजपाचे अखिल भारतीय सचिव तसेच आंध्रप्रदेशचे प्रभारी सुनील देवधर,पतीत पावन संघटनेचे
प्रांताध्यक्ष एस झेड तथा सोपानराव देशमुख,राजाभाऊ मुळे,डॉ.हृषीकेश मुळे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे,संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गुणे यांनी केले तर आभार तालुका संघचालक सुभाषराव कोथमिरे यांनी मानले.
या सोहळ्याला उपस्थित न राहू शकल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी अशोकरावांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. या सोहळ्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी,प्रचारक,स्वयंसेवक तसेच राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.