नगर -भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे. जन्मजात आई-वडिल हे गुरु लाभतात. शाळेत शिक्षक हे गुरुंची जागा घेतात. आपल्या ज्ञानाचे क्षेत्र कोणतेही असो ते साध्य करण्यासाठी जीवनात अध्यात्मिक गुरु पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने नगरसेवक सुनिल त्र्यंबके व अध्यक्ष योगेश पिंपळे यांनी रिंगणे दाम्पत्यांचा गौरव केला. यावेळी अनिल गाडे, राहुल जोशी, चंद्रकांत खिळदकर, प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
गेल्या 20 वर्षांपासून श्रीराम चौकात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिराच्या माध्यमातून भक्तांना राम नामाचे व्रत दिले. हजारो लोकांना अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाचा वसा दिला. अशा श्री.सुंदरदास रिंगणे व सौ.रेखाताई रिंगणे या गुरुजनांचा आदर करुन त्यांचा गुरुपौर्णिमेला सन्मान करणे हे कर्तव्य आहे, असेही श्री.त्र्यंबके म्हणाले.
भाविकांनी श्रद्धेने, भक्तीने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची सेवा करुऩ रामाला आपलेसे केले राम नाम घेतले त्याचे फळ त्यांना मिळाले याचा प्रत्यय प्रत्येकाला आला. असेच नामाला महत्व द्या, असे श्री व सौ.रिंगणे यांनी यावेळी सांगितले.
रिंगणे परिवार श्री. गोंदवलेकर महाराज यांचे निस्सिम भक्त आहेत. मंदिराच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ‘श्रीं’चा जन्मोत्सव, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा उत्सव, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव अशा कार्यक्रमांमधून राम नामाचे महत्व भाविकांना सांगतात. अशा या अध्यात्मिक गुरुंचे खूप शिष्य सावेडीसह जिल्ह्यात आहेत. गुरुपौर्णिमेला महाराजांच्या दर्शनासह त्यांचा आशिर्वाद भाविक घेतात, असे योगेश पिंपळे म्हणाले.