ते कमी बुद्धीचे लोक कोण ? राज्यात चर्चेला उधाण
मुंबई: ती जाहिरात काही कमी बुद्धीच्या लोकांनी दिली होती, दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी चूक मान्य केली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. मात्र ते कमी बुद्धीचे लोक कोण ? फडणवीसांचा इशारा कुणाकडे आहे? यावरून आता राज्यात चर्चेला उधाण आले आहेत . या मुलाखती दरम्यान फडणवीस यांनी अनेक राजकीय खुलासे केले . तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा, शरद पवार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
राज्यात मुख्यमंत्री शिंदे हेच राज्यातील सर्वात लोकप्रिय असल्याची जाहिरात काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती. त्यावर आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं “शिवसेनेच्या नावावर देण्यात आलेल्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पक्षात काही लोक हे कमी बुद्धीचे असतात. ती जाहिरातही कमी बुद्धीच्या लोकांनी दिली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चूक मान्य केली. त्यानंतर तो विषय माझ्यासाठी संपला. पण भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्याबद्दल राग होता, पण तो राग स्वाभाविक होता.”
१३ जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात एक शिवसेनेच्या नावे एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे हेच सर्वाधिक लोकप्रिय असून त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागतोय असा दावा करण्यात आला होता. त्या जाहिरातीवर फक्त एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या टॅगलाईनने ती जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
या जाहिरातीनंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही याची चर्चा सुरू झाली. त्या दिवशी राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रियता असल्याचं सांगितलं होतं. भाजप नेत्यांनी यावर टीका केली होती तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नवीन जाहिरात देण्यात आली आणि त्यावर शिंदे फडणवीस सरकार लोकप्रिय असल्याचं सांगत सारवासारव करण्यात आली.