संगमनेर : संगमनेर आणि सिन्नर भागातून मोटारसायकली चोरणारी चार चोरट्यांची टोळी संगमनेर शहर पोलिसांनी जेरबंद केली असून या टोळीकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीसह चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
गेले अनेक दिवस संगमनेरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते, मात्र या दुचाकी चोरांचा शोध घेण्यात शहर पोलिसांना यश येत नव्हते. मात्र गत आठवड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भगवान मथुरे नावाचे” खमके” पोलीस निरीक्षक मिळाल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला ही टोळी हाती लागल्याने यश आले आहे. दरम्यान संगमनेर शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी या संदर्भात गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भातच्या सूचना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना केल्या होत्या, त्यानंतर भगवान मथुरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस कर्मचारी फुरकान शेख,पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर,अमृत आढाव, सुभाष बोडखे,प्रमोद गाडेकर,शहर पोलीस ठाण्याचे अमित महाजन,दत्तू चौधरी यांच्या संयुक्त पथकाला सोबत घेत दुचाकी चोरांचा माघ काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी ओम दीपक जाणमाळी (रा. नाशिक, हल्ली संगमनेर) यांच्या चोरी गेलेल्या दुचाकीच्या शोधा दरम्यान या पथकाला अल्पवयीन दुचाकी चोराबाबत माहिती मिळाली. त्यानंतर या पथकाने या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यावर त्याने सुमित संजय कदम (रा. निमगाव टेंभी ता. संगमनेर) याच्यासोबत दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले तसेच या दुचाकी मोबीन मुबारक शेख आणि मंहमद फरदीन नाजीर शेख (रा. रहेमतनगर,संगमनेर) यांना विक्री केल्याचे सांगितल्याने पथकाने त्यांनाही ताब्यात घेत चोरी गेलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले. पोलिसांनी दुचाकी चोरांची टोळी पकडल्याने या पथकाच्या दमदार कारवाईचे शहरवासीयांकडून अभिनंदन होत आहे.