दुधाला ३४ रुपये भाव आणि अनुदानासाठी राहुरीत शेतकऱ्यांचे आंदोलन

0

मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :       

            दुधाला ३४ रुपये भाव व ५ रुपये अनुदान तसेच इतर मागण्यांसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दूध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तहसीलदार दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी हजर राहिले नाहीत, याच्या निषेधार्थ रवींद्र मोरे यांनी स्वतःचा दुग्धाभिषेक केला.

              नुकतेच महाराष्ट्र शासनाने दुधासाठी ३४ रुपये दर देणे बंधनकारक असेल, असा अध्यादेश जारी केला. हा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादकांची फसवणूक आहे. दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शासनाने दोन ओळीचा अध्यादेश काढला आणि सगळे मंत्रिमंडळ स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. या अध्यादेशामुळे दूध उत्पादकांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जादा होते आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. 

        शासनाने दुधाच्या गुण प्रतीस किती दर द्यावा, अशी मार्गदर्शक नियमावली जारी करावी, दुधाला ३४ रुपये भाव जाहीर करावा, एस एन एफ चा २० पैसे तर फॅटचा ३० पैसे डिडक्शन दर निश्चित करावा, तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळावे, शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोफत विमा संरक्षण मिळावे, डबल टोल दुधाला बंदी आणावी आदी मागण्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी आंदोलन प्रसंगी केल्या.

                  यावेळी राजू शेटे, प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, पिंटू साळवे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध व्यक्त केला. या प्रसंगी नितीन मोरे, राहुल करपे, सुनील इंगळे, जुगल गोसावी, संदीप शिरसाठ, प्रमोद पवार, शुभम गोसावी, सचिन गडगुळे, विलास तनपुरे, बालू गोसावी, संभाजी वामन आदींसह शेकडो शेतकरी आंदोलनात सामील झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here