संगमनेर : राहुरी येथील डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपमुख्याध्यापक फादर जेम्स याने शीख धर्मातील विद्यार्थ्याला ख्रिश्चन धर्मात धर्मांतरासाठी दबाव टाकला. या प्रकरणातील दोषींची सखोल चौकशी करा. त्यांना कठोर शासन करा. या मागणीसाठी मंगळवारी शिख, पंजाबी, सिंधी समाजाने मूक मोर्चा काढून प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदन दिले. या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला.
संगमनेर बस स्थानकासमोरील गुरुद्वारा येथून प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला. ख्रिश्चन समाजाकडून हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार जिल्ह्यात वाढताना दिसत आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील हरदीलसिंग सोदी या विद्यार्थ्यांचे केस कापले. धार्मिक चिन्हे मिटवून त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. या प्रकरणात उपमुख्याध्यापक फादर जेम्स याला अटक झाली असली तरी यामागे मोठी टोळी सक्रिय आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलिस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याने त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. यामुळे अशा घटना घडत आहे. संविधानातील कायदेशीर तरतुदींचे पालन व सामाजिक सद्भाव टिकण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व धर्मांतराचे प्रकार घडणार नाहीत, यासाठी लक्ष घालावे. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर कालडा, जसपाल डंग, राजु पंजाबी, महेश डंग, सुरेश डंग, डॉ. सुरज कालडा, अशोक पंजाबी, अनुज छाबडा, प्रदिप मिलाणी, विकी पापडेजा, नारायण पापडेजा, मुकेश मिलाणी, मनप्रित पंजाबी, प्रिन्स पंजाबी, टिंकू पंजाबी, किशोर पापडेजा, जयकिशन मिलाणी, पप्पू पंजाबी आदींनी निवेदनातून केली.