धोत्रे, खोपडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा -स्नेहलताताई कोल्हे 

0

कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, खोपडी परिसरात बुधवारी (५ जुलै) झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने धोत्रे, खोपडी व परिसरातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत द्यावी,अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगावच्या तहसीलदारांकडे केली आहे.

बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी धोत्रे, खोपडी व परिसरात जोरदार पाऊस झाला. या धुवाधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मका आणि इतर  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात नुकतीच पेरणी केलेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. शेतातील उभ्या पिकांचे या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सलग अडीच ते तीन तास कोसळलेल्या जोरदार वादळी 

पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जमीनदोस्त तर झाली, त्याशिवाय अनेक लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक लोकांचे संसार उद्धवस्त झाल्यामुळे ते उघड्यावर आले आहेत.

काल झालेल्या अतिवृष्टीचा धोत्रे, खोपडी व परिसरातील इतर काही गावांना मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत. तसेच समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या शेतात घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. राज्य रस्ते विकास महामंडळाने व संबंधित विभागाने या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी आपण यापूर्वीच केलेली आहे. यावर्षी समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

गेल्या वर्षी कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची अपरिमित हानी झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. शिंदे-फडणवीस सरकारने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करून दिलासा दिला. गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पैशांची जुळवाजुळव करून खरिपाची पेरणी केली, परंतु काल झालेल्या अतिवृष्टीमुळे धोत्रे, खोपडी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी पावसाने झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here