स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत.. कोपरगाव : कोपरगाव शहरातील बाजारपेठेला चालना मिळावी व स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांचा उत्कर्ष व्हावा, या उदात्त हेतूने मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन दिवाळीची खरेदी केली. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त रांगोळी, पणत्या, आकाश कंदिल, बांगड्या व इतर वस्तूंची स्थानिक व्यावसायिकांकडून खरेदी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी दिवाळी सणाची खरेदी स्थानिक बाजारपेठेतच करावी व आपल्या माणसांचा आर्थिक फायदा करावा, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे Snehaltatai Kolhe यांनी केले.
याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे यांनी बाजारपेठेत दिवाळीची खरेदी करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. ऑनलाईन खरेदी करताना जे समाधान मिळत नाही ते आपल्या शहरात स्थानिक बाजारपेठेत खरेदी करून मिळते. स्थानिक व्यावसायिक-व्यापारी ही सगळी आपलीच जवळची माणसं आहेत. त्यांना भेटून त्यांच्याकडून खरेदी केल्याने खूप आनंद होत असल्याचे या महिलांनी सांगितले.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, भारतीय संस्कृती जपणारा दिवाळीचा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतो. दिवाळी सणानिमित्त सगळीकडेच नवीन कपडे व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी लगबग दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ या आवाहनानुसार सर्वांनी आपल्या जवळच्या स्थानिक व्यावसायिकांकडूनच दिवाळीसाठी विविध वस्तूंची खरेदी करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल आणि त्यांच्याही घरी सुख-समृद्धीचे दीप प्रज्वलित होतील. हीच गोष्ट लक्षात घेऊन मी आज कोपरगाव शहरातील स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांकडून दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. दसरा, दिवाळीच्या सणाला बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. सध्याच्या स्पर्धेच्या काळात वेगवेगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांमुळे स्थानिक बाजारपेठेला मोठा फटका बसत असून, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोपरगाव शहरातच स्थानिक बाजारपेठेत खरेदी करावी. ज्यामुळे कोपरगाव शहरातील बाजारपेठेमध्ये आर्थिक उलाढाल वाढून अर्थकारणाला चालना मिळेल.
दिवाळीची खरेदी आपल्याच गावात झाली तर त्यामुळे निश्चितच आपल्याच माणसांचा म्हणजे स्थानिक व्यावसायिकांना चार पैसे मिळून आर्थिक फायदा होतो. रस्त्यावर बसून लक्ष्मीची मूर्ती विकणारे विक्रेते असो किंवा रांगोळी, पणत्या, आकाश कंदिल किंवा इतर साहित्य विकणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांकडे दिवाळीची खरेदी केल्यानंतर बाजारपेठेतील उलाढालीला व अर्थव्यवस्थेला चालना मिळते. कोपरगाव शहरातील बाजारपेठेला उर्जितावस्था आणून देण्यासाठी सर्वांनी स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करून आपल्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.
यावर्षी दिवाळी साजरा करताना या उत्सवाला दुष्काळाची किनार आहे. कमी पावसामुळे कोपरगाव मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. बळीराजा अडचणीत आहे. दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघ दुष्काळमुक्त होवो. यंदाची दिवाळी कष्टकरी शेतकरी, लहान-मोठे व्यावसायिक व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, भरभराट आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो, अशी प्रार्थना स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.