मुंबई, दि. 10 : राज्यातील नाट्य आणि इतर कलावंतांना प्रोत्साहन देण्याचीच भूमिका राज्य शासनाची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ हे निश्चित वेळेत आणि कालावधीत होईल, यादृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या हौशी नाट्य कलावंतांच्या विविध मागण्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मंत्री मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या कलावंतांच्या मागण्या ऐकून घेतल्या. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यावेळी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध पारितोषिके आणि पुरस्कार दिले जातात. विभागाने सकारात्मक पुढाकार घेत पुरस्कार वितरणाबाबत निश्चित कार्यक्रम तयार करून त्याच दिवशी संबंधित पुरस्कार अथवा पारितोषिके वितरित होतील, यादृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या पदाधिकारी यांनी केलेल्या विविध मागण्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल. नाट्य प्रयोग निर्मिती खर्च, दैनिक भत्त्यात वाढ करणे आदी मागण्यांची व्यवहार्यता तपासून पाहू. राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत, रंगभूषा आणि वेशभूषा या तांत्रिक बाबींसाठी तीन पारितोषिके द्यावीत, याचाही विचार करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे श्याम शिंदे, सलीम शेख, दिनेश कवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.