-लताताई त्रिभुवन यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केला संताप
कोपरगाव : दि.२५ डिसेंबर २०२२
नाताळ हा ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. या सणाच्या दिवशीसुद्धा ख्रिश्चन समाजाला पाणी मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. ख्रिश्चन समाजाला पाणी आणि इतर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, अशा शब्दांत लताताई त्रिभुवन यांनी नगर परिषदेच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त करून ख्रिश्चन समाजाच्या वतीने न.प. प्रशासनाचा जाहीर निषेध केला. आजी-माजी आमदारांनी याकडे लक्ष देऊन ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाताळ (ख्रिसमस) निमित्त आज कोपरगाव येथील मेथाॅडिस्ट चर्चमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती लताताई त्रिभुवन बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. हा समाज कधीही रस्त्यावर उतरत नाही. कोपरगाव शहरात ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येने राहतो. नाताळ हा ख्रिश्चन समाजासाठी फार महत्त्वाचा, आनंदाचा आणि मोठा सण आहे. नेमका नाताळ आला की, पाणी मिळत नाही. पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. नाताळ सणानिमित्त आमच्याकडे पाहुणे येतात. नेमके नाताळच्या सणाला आम्हाला पाणी मिळत नाही. पाण्याअभावी आमचे खूप हाल होतात. खूप त्रास होतो. नगर परिषद प्रशासन आमच्या या समस्येकडे लक्ष देत नाही. मी यासाठी आंदोलन करणार होते. नाताळच्या सणाला पाणीपुरवठा न करणाऱ्या नगर परिषदेचा ख्रिस्ती समाजातर्फे मी तीव्र निषेध करते.
नगर परिषदेने आमच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पाण्याची व्यवस्था करावी. नाताळ सणासाठी पाणीपुरवठा करावा. आम्ही कशाचीही अपेक्षा करत नाही. कारण, प्रभू येशू हाच ख्रिस्त समाजासाठी सर्वस्व आहे. प्रभू येशू ख्रिस्तच आमच्यासाठी सर्व काही पुरवठा करणारा आहे. आम्ही कोणाही आमदाराकडे म्हणत नाही की, तुम्ही आमच्या गरजा पुरवा. कारण, देव आमच्या सर्व गरजा प्रभू येशूमध्ये दिव्य भागातून पुरवठा करतो. आम्ही मनुष्याकडे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही की, तुम्ही आमच्या गरजा पुरवाव्यात; पण देवाने जर तुम्हाला लोकांची सेवा करण्याचा अधिकार दिला आहे तर मग दोन्ही आमदारांनी आमच्यासाठी, आमच्या ख्रिश्चन समाजाच्या सणासाठी पाण्याची तरतूद केली पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असे लताताई त्रिभुवन यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी आज ख्रिसमस अर्थात नाताळनिमित्त कोपरगाव शहरातील
मेथॉडिस्ट चर्च येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी फादर अजय भोसले, राजन त्रिभुवन, अमोल त्रिभुवन, नायडू अंकल, जॉन्सन पाटोळे, गायकवाड मिस्त्री, रोहिदास पाखरे, विश्वास पाटोळे, रेखाताई कोपरे, याकुबभाई पाटोळे, अप्पा पाटोळे,
त्रिभुवन आंटी, दादा पाटोळे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, संदीप देवकर, गोपीनाथ गायकवाड, सचिन सावंत, किरण सुपेकर, दादासाहेब नाईकवाडे व दयासागर ग्रुपचे सभासाद तसेच ख्रिश्चन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या दीड महिन्यांपासून कोपरगाव शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ते पाणीही दूषित आहे, दीड महिन्यांपासून शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्याचीच प्रचिती आज नाताळ सणादिवशी आली. पाण्याच्या तुटवड्यामुळे ख्रिश्चन समाजाला मोठा फटका बसला. नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याकडे विद्यमान आमदार व नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा आज नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित करण्यात आला. दरम्यान, आठ दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन भाजप, शिवसेना व आरपीआयच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले असून, पाणीटंचाई त्वरित दूर करून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.