नाशिक पदवीधरचा निकालात नगर जिल्ह्यातील मतदार ‘किंगमेकर’ ठरणार

0

तब्बल ४४ टक्के मतदार, संगमनेरचे सर्वाधिक मतदान ; जिल्ह्यातीलच चारजण रिंगणात

देवळाली प्रवरा  / राजेंद्र उंडे 

          अनेकविध राजकीय घडामोडींमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल नगर जिल्ह्यातील मतदारच ठरवणार आहे. या निवडणुकीतील एकूण अडीच लाख़ावर मतदारांमध्ये तब्बल ४४ टक्के मतदार फक्त नगर जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे हे मतदार ज्या उमेदवाराच्या पारड्यात सर्वाधिक क्रमांक १ असा पसंती क्रमांक नोंदवतील, तो उमेदवार बाजी मारणार आहे. याचा अर्थ नाशिक पदवीधर निवडणुकीत नगर जिल्ह्यातील मतदार ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. नगर जिल्ह्यातील चार उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या ४४ टक्के मतांतील किती मते हे उमेदवार घेतात, यावर अन्य जिल्ह्यांतील उमेदवार व मतदारांच्या मतांची गोळाबेरीज निर्णायक ठरणार आहे. 

             नाशिक पदवीधर निवडणुकीत नगर जिल्ह्यातून या मतदारसंघाचे विद्यमान काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पुन्हा उमेदवारी दाखल केली नसली तरी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्याशिवाय अँड. सुभाष राजाराम जंगले (श्रीरामपूर), सुभाष निवृत्ती चिंधे व   पोपट सीताराम बनकर (दोघे अहमदनगर) असे अन्य तीन उमेदवार आहेत. तर राहिलेल्या १२ उमेदवारांमध्ये नाशिक, धुळे, मालेगाव येथील उमेदवारांचा समावेश आहे. पण नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयासाठी नगर जिल्ह्यातील मतदार उमेदवारांसाठी ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचे मतदारांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. नगर जिह्यातून जो उमेदवार जास्त पदवीधर मतदान घेईल, तोच निवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता आहे. कारण एकूण मतदारांपैकी तब्ब्ल ४४ टक्के मतदार नगर जिह्यातील आहेत. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान असून, २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, नाशिक विभागातील नाशिकसह नगर, धुळे, नंदूरबार व जळगाव या ५ जिल्ह्यांत एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. 

              नाशिक पदवीधर मतदार निवडणुकीतील नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीवर दावे व हरकती मागविण्यात आल्या. त्यानुसार पहिल्या पुरवणीत ४८ हजार १७८ मतदारांची नोंद झाली. त्यामध्ये १ हजार ६४५ मतदारांची नावे दुबार आढळल्याने ती वगळण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा २९ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ पर्यंत मतदार नोंदणीची संधी देण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या पुरवणीत १ हजार ९२४ मतदारांची भर पडली. या दुसऱ्या पुरवणीत २ हजार ६४३ नावे दुबार आढळली. त्यामुळे ही नावे वगळून नुकतीच   जिल्हानिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात सर्वाधिक मतदार नगर जिह्यात आहेत. नगर जिल्ह्यामध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार (४४ टक्के), नाशिक जिह्यात ६९ हजार ६५२ (२५ टक्के), जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८ मतदार

(१३ टक्के), धुळे जिह्यात २३ हजार ४१२ मतदार (१० टक्के) व नंदूरबार जिह्यात १८ हजार ९७१ (७ टक्के) इतके मतदार आहेत.

संगमनेरला सर्वाधिक नोंदणी

            नगर जिल्ह्याची तालुकानिहाय अंतिम मतदारसंख्या अशी : अकोले तालुका ८ हजार ११२ मतदार, संगमनेर २९ हजार ११५, राहाता १५ हजार २५७, कोपरगाव ८ हजार ४६४, श्रीरामपूर ८ हजार १३१, राहुरी ७ हजार ७७०, नेवासा ६ हजार ८८५, नगर १० हजार ३८४, पाथर्डी ४ हजार २८२, शेवगाव ४ हजार १४३, पारनेर ३ हजार ७६०, श्रीगोंदा ४ हजार ३८५, कर्जत २ हजार ८९६ व जामखेड तालुका २ हजार ५४ इतके मतदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here