नुकसान भरपाईसाठी न्यायालयात जाण्याची शेतकऱ्यांची तयारी
कोपरगाव(वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरातील गोदावरी उजव्या कालव्याचा संपूर्ण भाग चालू वर्षी कालवा वाहत असताना देखील सुकला आहे. याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनी आहे. गोदावरी कालव्याच्या आजूबाजूची वीज खंडित करण्याचे आदेश जाहीर झाल्याने शेतकऱ्यांचे वाटोळे होत आहे. कालवा लागत असलेल्या शेतकऱ्यांचे विहिरीचे सातबारा, वीज कनेक्शन व इतर सर्व तांत्रिक बाबी कायदेशीर असल्याने पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असा इशारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे यांनी दिला आहे.
या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.1सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत गोदावरी उजव्या कालव्याला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या मागणीनंतर प्रशासनाने विद्युत वितरण कंपनीला या परिसरातील विद्युत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. परिणामी गेल्या शंभर वर्षापासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्याच्या निर्मितीमध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विहिरी घेऊन रितसर कनेक्शनही घेतलेले आहे मात्र गोदावरी कालवा सुटला की विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज बंद करायची त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात घेतलेली पिके कशी वाजवायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. गोदावरी कालवा वाहत असताना देखील शेतीला पाणी जर मिळत नसेल तर या कालव्याचा उपयोग काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वीज वितरण कंपनीने पाटबंधारे विभागाचे एकूण सरसकट विद्युत बंद करू नये. ज्यांच्या विहिरीच्या रीतसर नोंदी आहेत आणि ज्यांचे वीज कनेक्शन आहे अशा शेतकऱ्यांना विहीरीतील पाणी उचलण्यासाठी परवानगी द्यावी तो त्यांचा हक्क आहे. गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला मोठी लोक वस्ती असून पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न विद्युत वितरण कंपनीने विद्युत बंद केल्यामुळे निर्माण झाला आहे.
पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यावर अन्याय करू नये .या दोनही विभागांनी शेतकऱ्यांना विनाकारण वेठीस धरू नये अन्यथा नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांना बरोबर घेत न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचे ज्ञानदेव औताडे यांनी सांगितले.