पोहेगांव पंचकेश्वर परिसरात शेतकऱ्याच्या एकाच वर्षात तीन विद्युत मोटार चोरीला

0

शिर्डी पोलीस स्टेशन बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी

कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सचिन बाळासाहेब औताडे यांच्या पंचकेश्वर शिवारातील विहिरीवरून अज्ञात चोरट्यांनी विद्युत मोटारीसह केबल चोरून नेली. या अगोदरही औताडे यांच्या विहिरीवरून दोन विद्युत मोटारी चोरीला गेलेल्या आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा शिर्डी पोलीस स्टेशन ने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.सचिन औताडे यांची पोहेगाव बुद्रुक परिसरातील पंचकेश्वर शिवारात सर्वे नंबर 165 मध्ये शेती आहे. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांच्या विहिरीवर नव्यानेच लक्ष्मी कंपनीची 27 हजार रुपयांची विद्युत मोटर त्यांनी बसवली होती.रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला असताना चोरट्यानी याचा फायदा घेत त्यांची विद्युत मोटर विहिरीतून काढून चोरून नेली.मोटारी बरोबर असलेली केबल देखील या चोरट्यानी आपल्या सोबत नेली आहे.या अगोदरही या शेतकऱ्याच्या दोन विद्युत मोटारी गत वर्षात याच विहीरी वरून चोरट्यांनी लांबवल्या होत्या.पंचकेश्वर शिवारात सोनेवाडी पोहेगाव आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, स्टँटर व इतर शेती उपयोगी असलेले साहित्य चोरट्यानी चोरण्यास सुरुवात केली आहे.या चोरट्यांची संख्या जवळपास दहा ते पंधरा असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकाच रात्री या परिसरातील तब्बल दहा ते पंधरा मोटार चोरी गेल्याने शेतकऱ्यांनी आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनने देखील घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शेतकऱ्यांच्या वारंवार होत असलेल्या चोऱ्या रोखण्यासाठी या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.सध्या पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या विहिरीतील पाणीच पिकांना द्यावे लागत असल्याने या चोरीच्या घटनेमुळे शेतकरी पूर्णतः आर्थिक अडचणीत सापडत आहे. या चोरट्यांचा शिर्डी पोलीस स्टेशन ने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here