संगमनेर : वैशिष्ट्यपूर्ण जोर्वे गावा इतकाच वैशिष्ट्यपूर्ण असलेला दिघे परिवार,प्रामाणिक, हुशार, शांत संयमी स्वभाव तसेच स्वकर्तृत्व, परिश्रम, जिद्द, यातून निर्माण केलेल्या धाकातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्राचार्य एम.वाय दिघेंनी शैक्षणिक व संघटनात्मक प्रशासनात केलेले कार्य आणि शिवाजीराव दिघे यांनी विश्वासाने ,अधिकारवाणीने गावातील शेत जमिनीचे तंटे सोडवत सामाजिक आणि राजकीय कार्य करत आपले अढळ स्थान निर्माण केले असून त्यांचा ज्ञानदानाचा वसा आदर्शवत असल्याचे गौरोवोद्गार माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
भाऊसाहेब गुंजाळ पाटील, सह्याद्री विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मच्छिंद्र यादवराव दिघे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे ,नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे,सौ कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे,एकविरा फाउंडेशनच्या डॉ जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे ,अजय फटांगरे, विवेक कासार,कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, प्रा. सोपानराव कदम , गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे ,संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, खजिनदार तुळशीनाथ भोर,सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, भाऊसाहेब थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. थोरात यांनी जीवनात आनंदी राहून दिघे परिवाराने सामाजिक,आर्थिक संपन्नता जपून आगामी काळात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे योगदान संस्थेसाठी निश्चितच मोलाचे राहील, असे प्रतिपादन केले. आमदार सत्यजित तांबे यांनी देशातच नव्हे ,तर जगात अनेक गुणवंत विद्यार्थी सह्याद्री आणि अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने घडविले असून प्राचार्य दिघे सरांचे विद्यार्थी संस्कारातील योगदान हे अलौकिक असून शिक्षक कधीही रिटायर होत नाही तर देशाची भावी पिढी घडवत असतात,असे मत व्यक्त केले. एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सुनंदाताई व एम.वाय. दिघे सर हे डायनामिक कपल असून शैक्षणिक, राजकीय ,सामाजिक क्षेत्रात कार्यकर्तृवाचा ठसा उमटविला आहे ,असे प्रतिपादन केले.
सौ दुर्गाताई तांबे यांनी शांत, परफेक्ट आणि फास्ट गृहिणी म्हणून सौ सुनंदाताई दिघे यांचे प्रसंगावधानी व्यक्तिमत्व आपल्या भाषणातून उलगडून प्राचार्य दिघे सर यांच्या हुशार संयमी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. प्रा संजय शिंदे यांनी संगमनेरच्या राजकारणाची आणि नेतृत्वांची मुक्तपणे प्रशंसा करून प्राचार्य दिघे सर हे संघटना आणि प्रशासन शासन पातळीवर समन्वय साधून सेतूरुपी कार्य संघटनेच्या माध्यमातून केल्याचे नमूद केले.
प्राचार्य मच्छिंद्र दिघे यांनी, भाऊसाहेब थोरात दादांनी सह्याद्री शिक्षण संस्थेत मला संधी दिली तर पितृछत्र हरपल्यानंतर थोरले बंधू शिवाजीरावांनी परिवाराची काळजी घेतली.खडतर शैक्षणिक वाटचालीनंतर शैक्षणिक व सामाजिक कार्यात अनेक सहकाऱ्यांनी व थोरात परिवारांनी आम्हाला जपलं याचा विशेष उल्लेख करून संस्थेवर प्रेम करणाऱ्या दादांनी व्यक्तीच्या चुकांसाठी कठोर मार्गदर्शनही केल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,संस्थेचे चेअरमन सुधीर तांबे ,नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे, तसेच प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.
सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त प्राचार्य मच्छिंद्र यादवराव दिघे यांचा सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,सह्याद्री शिक्षण संस्था,सह्याद्री पत संस्था ,कनिष्ठ महाविद्यालय संघटना यांच्या वतीने सन्मानचिन्ह, मानपत्र, भेटवस्तू शाल, पुष्पहार देऊन आ.बाळासाहेब थोरात ,डॉ. सुधीर तांबे ,आ.सत्यजित तांबे, आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी , संस्थेचे सदस्य, शालेय व्यवस्थापन व विकास समिती सदस्य , जोर्वे गावचे ग्रामस्थ ,दिघे परिवाराचे नातलग व मित्रपरिवार, तसेच सह्याद्री प्राथमिक,माध्यमिक, ज्युनियर व वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, इन्चार्ज पर्यवेक्षक,शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकेतर प्रतिनिधी, शिक्षक व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर सेवक वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन प्रा गणेश गुंजाळ यांनी केले ,तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक इन्चार्ज एस.एम खेमनर यांनी केले.