डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयात फ्रेशर पार्टीद्वारे नवगतांचे स्वागत
नगर – विद्यार्थ्यानी ध्येय निश्चित करुन कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळत असते. शिक्षक हे आपले जीवन घडविणारे खरे मार्गदर्शक आहे. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. तुमचे स्वागत सिनिअर विद्यार्थी करत आहेत, ही आनंददायी बाब आहे. कारण गेल्या काही वर्षांत रॅगिंगचे प्रकार वाढले असतांना विखे पाटील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील नाते दृढ करणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपआपसात स्नेहभाव ठेवून शिक्षण घ्यावे. आजही ही मैत्री जीवनात अनेकवेळा उपयोगी पडत असते. कॉलेजचे जीवन हे भारावून टाकणारे असेच असते. याचा आनंद घ्या, असे प्रतिपादन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक गजेंद्र इंगळे यांनी केले.
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक गजेंद्र इंगळे, प्राचार्य डॉ. एम. बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत,प्राध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, शिक्षण पुर्ण झाल्यावर परिपूर्ण विद्यार्थी बाहेर पडावा, त्याला पुढील वाटचालीस कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात असतात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये समन्वय रहावा, त्यांच्यातील मैत्री घट्ट व्हावी, त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा, यासाठी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना आपल्या परिवारातील सदस्य बनविले जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आज या महाविद्यालतील माजी विद्यार्थी अनेक उच्चस्थ पदावर, व्यावसायिक म्हणून कार्यरत असल्याचे प्राचार्य धोंडे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करुन दिला.विद्यार्थ्यांसाठी रॅम्पवॉक, संगीतखुर्ची, पारंपारिक नृत्य व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन कु.वैष्णवी बनकर व दर्शन बोरुडे यांनी केले. प्रास्तविकात उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ऋषीकेश कदम व कु.अनुष्का तुपे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे प्रभारी सचिव डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.