बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जामखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा

0

जामखेड तालुका प्रतिनिधी 

बांगलादेश येथे हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार व धार्मिक दडपशाही. विरुद्ध जामखेड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून जामखेड चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आले आहे. सदरील घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे. बांग्लादेशमध्ये ४ ते २० ऑगस्ट दरम्यान ५० जिल्हांमध्ये हिंदू समाजावर दोन हजार पेक्षा अधिक जातीय हल्ले झाले. यामध्ये हिंदू घरे, हिंदू समाजाचे व्यवसाय व हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे .

दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे व व्यवसाय जाळून, उध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे. बांग्लादेश मधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे कि, हिंदू महिलांवर सामुहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.  काही ठिकाणी तर हिंदूंवर अत्याचार होत असताना बांग्लादेशाचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे. तेथे नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांग्लादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे.

बांग्लादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे व राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांग्लादेश मध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची व मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे. बांग्लादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे, आज हिंदू समाजात असलेला रोष या “मानवाधिकार मूक मोर्चाच्या” माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहचू इच्छितो कि, बांग्लादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेवून अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर जामखेडचे तहसीलदार  गणेश माळी यांनी आपला मुद्दा हा पीएमओ कार्यालयापर्यंत पोहोचवण्यात येईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here