ब्राम्हणीतील ‘त्या’ उद्योजकाच्या खात्यावर  ४० लाख आले ; त्यांनी ती रक्कम प्रामाणिकपणे केली परत !

0

 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  

           अचानक जर तुमच्या बँक खात्यावर चाळीस लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला तर ????? तुम्हाला कुणाकडूनही येणे नाही, तुमची कुणाकडेही बाकी नाही, तुम्ही पैशाची मागणी कुणाकडेही केलेली नाही, तरीही तुमच्या बँक खात्यावर अचानक ४० लाख रुपये जमा झाले तर ? होय, हे खरे आहे, ब्राम्हणी येथे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीनअप कंपनीच्या बँक खात्यात ३० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी अचानक चाळीस लाख अठेचाळीस हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक सचिन ठुबे यांच्या मोबाईलवर आला. जमा झालेल्या रकमेबाबत शंका वाटल्याने सचिन ठुबे यांनी बँकेत चौकशी केली. हे पैसे कशाचे आले, कुणी पाठवले, आपल्याला तर कुणाकडून येणे नाही मग आले कोठून, रक्कम आलीय पण खाते उताऱ्यावर जमा नोंदीत डिटेल्स काहीही नाही, असे अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण झाले. त्यामुळे संबंधित सचिन ठुबे यांनी बँकेला हे चाळीस लाख माझे नाही असे कळवले, सोबत राहुरी पोलिसांना देखील घडलेल्या प्रकाराची लेखी माहिती दिली. व शोध घेऊन ही रक्कम ज्याची असेल त्याला परत करा, कुणावर अन्याय व्हायला नको असे, सांगितले.

             परंतु ३१ डिसेंबरचा मंथ एन्ड, शनिवार, रविवार सुटी असल्याने रकमेबाबत या अधिक तपशील उपलब्ध होत नव्हता. अखेर सोमवारी म्हणजे दोन जानेवारीला उशिरा “शासना कडून ही रक्कम जमा झाल्याचे बँकेने जाहीर केले. आता ही संस्था नेमके काय काम करते, तीने कशाचे पैसे जमा केले हे कळायला मार्ग  नव्हता. त्यामुळे झालेला प्रकार पुन्हा सचिन ठुबे यांनी राहुरीचे पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांना कळवीला. दरम्यान राहुरी पोलिसांनी देखिल याचा तपास सुरु केला होता. पोलिसांच्या मदतीने अधिक तपशील उपलब्ध झाल्यानंतर सचिन ठुबे यांनी केंद्रीय पातळीवरील त्या संस्थेशी संबंधित पुण्यातील कार्यालयाला स्वतःहून संपर्क केला व तेथील अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पुण्यातील अधिका-यांनी झालेला प्रकार वरिष्ठ कार्यालयाला कळवला चूक निदर्शनास आणून दिली.  झालेली त्या त्या प्रकारा नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची माहिती घेवून अकाऊंट नंबर चुकल्याने ही अनावधानाने रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे असे कळवले. अखेर जमा झालेली रक्कम परत करण्या बाबतची कायदेशीर प्रक्रीया बुधवारी ४ जानेवारी रोजी पुर्ण झाली आणि त्या कार्यालयातील त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोबत त्या कार्यालयातील सर्व अधिका-यांनी सचिन ठुबे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतूक करत आभार मानले.

               दरम्यान अनावधानाने झालेल्या ह्या प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी नको तो सल्ला देखील दिला. अनेकांनी फोनवरून संबंधित उद्योजकाकडे चौकशी देखील केली. परंतु आपण काय कमवायचं ते प्रामाणिकपणे कमवू, फुकटचा पैसा आपल्याला नको, ज्यांची कुणाची ही रक्कम असेल त्या एखाद्या निष्पाप व्यक्तीवर अन्याय होऊ नये ही माझी प्रामाणिक भूमिका असल्याचे सचिन ठुबे यांनी सांगितले. सचिन ठुबे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, राहुरीचे तहसीलदार एफ. एस शेख, पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांच्यासह अनेकांनी फोनकरून तसेच प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे.

….त्यांनी प्रामाणिकपणा दाखविला!

             ग्रीनअप कंपनीच्या खात्यावर अनाहूतपणे रक्कम जमा झाल्याचा अर्ज प्रशासनाला प्राप्त झाला होता त्याचा गुंता सुटला आहे. स्वतःहुन पुढे येऊन प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या सचिन ठुबे यांचे आम्हाला कौतुक आहे. घनश्याम डांगे, पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here