कोपरगांव (वार्ताहर) दि. ९ मार्च २०२३
देश पातळीवर कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन या संस्थेच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची फेरनिवड झाली. यापूर्वी सन २०१९ ते २२ या तीन वर्षाच्या कालावधीतही ते फेडरेशनवर संचालक पदावर कार्यरत होते. एक अभ्यासू व कार्यतत्पर संचालक म्हणून फेडरेशन बोर्डाने त्यांची पुन्हा निवड केली.
कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून श्री परजणे कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. दूध व्यवसाय क्षेत्रातला गाढा अभ्यास व दूध उत्पादकांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठीची त्यांची कार्यतत्परता या गोष्टी विचारात घेऊन फेडरेशनने त्यांची पुन्हा संचालक म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना तुमच्यासारख्या वचनबध्द आणि सकारात्मकदृष्टी असलेल्या नेत्यासोबत काम करणे आम्हाला नेहमीच आनंददायी वाटते. ग्रामीण समुदायाच्या उन्नतीसाठी आपल्यासोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे फेडरेशनचे चेअरमन मंगलजीत राय यांनी पत्रात नमुद केलेले आहे.
भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविलेल्या आहेत. त्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे. श्री परजणे पाटील यांनी यापूर्वी देश पातळीवर काम करणाऱ्या कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे. अनेक सहकारी, शासकीय, निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सद्या कार्यरत आहेत.
भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या संचालकपदी पुनःश्च झालेल्या निवडीबद्दल श्री परजणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुगधविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील. महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव आदिंनी अभिनंदन केले.