संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
नगर – गेल्या काही वर्षांपासून डोळ्यांचे विकार वाढले आहेत, त्यामुळे वेळेच उपचार केल्यास मोठ्या दुखण्यापासून बचाव होवू शकतो. त्याचप्रमाणे मोतीबिंदू होण्याचे प्रमाणही वाढत आहेत. त्याचे ऑपरेशन तातडीने करणे गरजेचे असते. परंतु आज अनेक गोर-गरीबांना उपचार करणे परवडत नसल्याने त्या याकडे दुर्लक्ष करतात, पर्यायाने दृष्टी जाऊ शकते. अशा रुग्णांसाठी फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे गेल्या 32 वर्षांपासून आयोजन करुन अनेकांना दृष्टी देण्याचे काम सुरु आहे. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार होत असल्याने शस्त्रक्रिया यशस्वी होऊन दृष्टी मिळत असल्याने त्यांचे आशिर्वाद आम्हास मिळत आहेत. समाजातील दुर्लक्षित, ज्येष्ठ नागरिक, गरीब घटकांना मोफत उपचार मिळावे, त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी फिनिक्स फौंडेशन पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.
संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नागरदेवळे येथे फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोहिनीराज कुर्हे, वसंत पानमळकर, किसन धाडगे, निर्मला पानसरे, वैष्णवी पटारे, माया आल्हाट, मनिषा कोरडे, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, राजेंद्र बोरुडे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना बोरुडे म्हणाले, संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत शिबीराच्या माध्यमातून त्यांचे आचार-विचार कृतीतून अंगीकारले जात आहे. समाजाच्या भल्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले, मनुष्याच्या सेवेतच ईश्वर सेवेचा संदेश त्यांनी दिला. हा संदेश प्रत्यक्षात आणणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.
या शिबीरात 379 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 97 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. यावेळी 43 जणांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.