मरणासन्न आरोग्य केंद्रावर दुरुस्तीचे उपचार होणार का?

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :

                 देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे तीन तेरा वाजले असुन दुरावस्था झालेल्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा दैनंदिन कारभार सुरु असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासन विभागाने आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा प्रस्ताव देवूनही वरीष्ठ स्तरावरुन माञ याकडे दुर्लक्ष केले असल्याने आजारी पडलेल्या आरोग्य केंद्रावर दुरुस्तीचे उपचार होणार का? उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या डोक्यात छत पडल्या नंतर दुरुस्ती केली जाणार का? असा सवाल येथिल नागरीकांनी केला आहे. 

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावात जिल्हा परीषदेने ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली 1965 साली प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली होती.आजच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 12 गावासांठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली मांजरी, उंबरे, बा.नांदुर,गुहा,ताहराबाद या आरोग्य केंद्राचा कारभार चालत होता.काही वर्षापुर्वी टाकळीमियाँ, गुहा, मांजरी, उंबरे, बा.नांदुर,ताहाराबाद येथे स्वतंञ प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली.त्यामुळे देवळाली प्रवराच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावाच्या संख्या कमी झाली.देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या 17 गावातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारी देवळाली प्रवरा, राहुरी फँक्टरी, लाख, जातप, करजगाव, दरडगाव, चांदेगाव, बोधेगाव,ब्राम्हणगाव,कणगर,वडनेर, चिंच विहिरे, आंबी अमळनेर,केसापूर या गावाचा समावेश आहे.

                देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 1965 साली उभारण्यात आली आहे.या इमारतीचे वय 58 वर्ष पुर्ण झाले आहे.जिल्हा परीषद आरोग्य खात्या कडून या इमारतीवर डागडुजीचा खर्च हि केलेला नाही.आज इमारतीची दुरावस्था निर्माण झाली असुन इमारतीचा छताचा काही भाग जागोजागी गळून पडलेला आहे.दर वर्षी भिंती रंगवल्या जातात परंतु त्याच भिंतींना मोठ मोठे तडे गेले आहेत.या इमारतीचा छताचा भाग कधीही कोसळा जावू शकतो.उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णास जखमी होण्याची वेळ येवू शकते. महिलांना उपचार घेण्यासाठी व्यवस्थित अशी कौणतीही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नाही.या ठिकाणी बाळंतपणाची व्यवस्था आहे परंतू रुग्णास राहण्यासाठी व्यस्थीत बेड, स्वच्छतागृह नसल्याने अनेक रुग्ण नाईलाजाने खाजगीचा रस्ता धरतात.औषोधोउपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे मिळण्या ऐवजी औषधांच्या दुकानातून औषधे विकत घेण्याचा सल्ला दिला जातो.पुरेसा प्रमाणात ओषधे उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांच्या रोषाला येथिल कर्मचाऱ्यांना बळी पडावे लागते.

 या आरोग्य केंद्रात दर वर्षी 1हजार 400 ते 1 हजार 500 रुग्णांची कुटुंबनियोनाची शस्ञक्रिया केली जाते.शस्ञक्रियेनंतर रुग्णास घरपोहच करण्याची जबाबदारी येथिल प्रशासनाची असते.याठिकाणी रुग्णवाहीका आहे.परंतू गेल्या 25 वर्षा पासून वाहन चालकच मिळाला नसल्याने वाहने असुन हि ती एकाच जागेवर उभी ठेवावी लागत आहे.नविन वाहने काही दिवसांनी भंगारात विकण्यासाठी काढावी लागणार आहे. या आरोग्य केंद्रात अनेक वरीष्ठ आधिकारी भेटी देतात.या आधिकाऱ्यांच्या डोळ्याला सर्व काही दिसत असतानाही आंधळ दळतय आणि कुञ पीठ खातय अशी अवस्था निर्माण झाली आहे.

                राजकिय व संघटनाचे पदाधिकारी आरोग्याच्या मुलभूत सुविधेकडे लक्ष देण्या ऐवजी राजकिय कुरघोडीतून विकास कामावर टिका करण्यात मग्न आहे.श्रीरामपूर विधानसभेचे आ.लहू कानडे व राहुरी विधानसचे आ.प्राजक्त तनपुरे  शिर्डी लोकसभेचे खा. सदाशिव लोखंडे असे दिग्गज नेते असताना एका हि नेत्याने प्राथमिक आरोग्य केंद्रा बाबत विधानसभेत व लोकसभेत चकार शब्द हि काढला नाही. हेच देवळालीकरांचे दुर्देव आहे.

                 उबाठा सेना व  वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नावर लक्ष घातले असुन लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी करताना वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, कार्याध्यक्ष आबासाहेब कदम, शिवसेनेचे  अनिल चव्हाण, युवा सेनेचे शहराध्यक्ष मनीष देठे, युवा आघाडीचे शहराध्यक्ष अभिजीत मुसमाडे, विठ्ठल सरोदे,सागर सरोदे,अभिजीत वरघुडे, गंगा सरोदे,श्याम सरोदे, संजय दुधे,मयूर आडगळे, रुपेश सरोदे,रवींद्र सरोदे, भारत कडू,एकलव्य आघाडी चे गीताराम बर्डे आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here