महाराष्ट्रात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस …. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

0

पुणे : महाराष्ट्रात एप्रिल महिना हा पावसाचा ठरला. एप्रिल महिन्यात राज्यातल्या विविध भागांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. विदर्भातल्या काही नद्यांमध्ये तर एप्रिल महिन्यातल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

मे महिन्यातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळतंय. अशातच बंगालच्या उपसागरात 8 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का, राज्याला मे महिन्यामध्ये पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व बंगाल उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रात 8 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 9 मे पर्यंत अजून ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन त्याच बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे प्रवास होऊ शकतो.

“अजून आयएमडी कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल काही अलर्ट दिलेला नाहीये. अंदमान-निकोबार मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 8 ते 12 मे मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांचे इशारे देण्यात आलेले आहेत. मच्छिमारांसाठी, पर्यटकांसाठी हे इशारे देण्यात आलेले आहेत,” असं के एस होसाळीकर यांनी सांगितलं.

सध्या अनेक माध्यमांमधून या होऊ शकणाऱ्या चक्रीवादळाचा उल्लेख मोका असा केला जातोय. पण अजून हवामाव विभागानं अधिकृतपणे त्याचं नाव जाहीर केलेलं नाही असं होसाळीकरांनी सांगितलं. याचसोबत वादळाच्या ट्रॅकचे अनुमान आल्यावर अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here