कोपरगांव :
नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांच्या जनकल्याणासाठी सन १२२० मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ८०४ वर्षापुर्वी लिखाण केले असुन मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. सालाबादप्रमाणे याही वर्षी शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सांस्कृतीक मंडळ, संजीवनी उद्योग समुह, व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने अखंड ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे हनुमान मंदिरात मंगळवारी आयोजन करण्यांत आले त्याचे दिपप्रज्वलनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंचलगांव येथील ह.भ.प व व्यासपिठचालक जालिंदर महाराज शिंदे होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक श्री. बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्या जाणा-या विविध अध्यात्मीक, सांस्कृतिक, धार्मीक कार्याची माहिती दिली.
बिपीनदादा पुढे म्हणाले की, अत्यंत कमी वयात संत ज्ञानेश्वरांनी संपुर्ण विश्व कल्याणासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन करून सर्वांच्या जीवनांत आनंद निर्माण केला आहे. विश्वाला चेतना देण्यांचे काम ऐतिहासिक, पौराणिक व अध्यात्मीक वारसा असलेल्या, विविध संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्याच अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्हयांने केले आहे हे आताच्या तरूणपिढींने जाणुन घ्यावे, सर्व ज्ञानेश्वरी ओव्यांचे पाठांतर करावे, जीवन व्यतीत करतांना प्रत्येकाला नेहमी अडचणींना सामोरे जावे लागते त्यात मार्ग दाखविण्यांचे काम ज्ञानेश्वरी ग्रंथ करतो. माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी कर्माबरोबरच सामाजिक कार्याला पाठबळ देवुन संजीवनी उद्योग समुहाबरोबरच तालुक्याचे, जिल्हयाचे व राज्याचे भले व्हावे यासाठी जनकार्य केले. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन आपल्या सर्वांचे मार्गाक्रमण सुरू आहे.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, संजीवनी ग्रुप हेड संजय पवार, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, सुकदेव सुडके, विलास कहांडळ यांच्यासह शिंगणापुर पंचक्रोशीतील असंख्य भाविक तसेच संजीवनी महिला मंडळाच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सांस्कृतिक मंडळाचे सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे व वसंत थोरात यांनी केले. शेवटी संचालक विश्वासराव महाले यांनी आभार मानले.