कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न किती गंभीर होता व किती महत्वाचा होता याची माजी नगरसेवक या नात्याने मला चांगलीच जाणीव आहे. आ. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करून ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. रविवार (दि.१५) रोजी या ५ नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन होणार असून हा दिवस कोपरगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल अशी प्रतिक्रिया काळे गटाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉ.अजय गर्जे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी महत्वपूर्ण जाबाबदारी पार पाडणाऱ्या व आ. आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन कार्यक्रमाबाबत ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉ.अजय गर्जे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कोपरगाव शहराचा ज्वलंत असलेला पाणी प्रश्न सुटणारच नाही अशी मानसिकता तयार झालेल्या अनेकांनी कोपरगाव शहर सोडून दुसऱ्या शहरात जावून आपले बस्तान बसविले आहे. कारण कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळे संपूर्ण कोपरगाव शहराची बाजारपेठ उध्वस्त झाली होती. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविणे म्हणजे मोठे आव्हानच होते. मात्र हे आव्हान आ. आशुतोष काळे यांनी स्वीकारून ते काही चुकीच्या लोकांनी विरोध करून देखील पूर्ण करून दाखविले हि खरोखर कौतुकास्पद बाब आहे.
या पाच वर्षात कोपरगाव शहराचा विकास झाल्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था देखील प्राप्त होत आहे. हे दोन तीन वर्षापासून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना जाणवत देखील आहे.५ नंबर साठवण तलावामुळे नागरिकांना नियमित पाणी मिळणार असून कित्येक दशकापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार तर आहेच त्याचबरोबर कोपरगावच्या बाजारपेठेचे गेलेले गतवैभव देखील परत येईल याचा मला विश्वास आहे. नागरिकांना नियमित स्वच्छ पाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने दूर होणार आहे.
त्यामुळे कोपरगावकरांच्या दृष्टीने येणारा रविवार (दि.१५) अतिशय भाग्याचा दिवस आहे. सर्वच दृष्टीकोनातून ५ नंबर साठवण तलावाचे महत्व कोपरगावकरांसाठी अनन्यसाधारण असून हा दिवस कोपरगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे काळे गटाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉ.अजय गर्जे यांनी म्हटले आहे.