कोपरगांव:- दि. १९ डिसेंबर
उस वाहतुकीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे शेतातील उस वाहनातुन कारखानास्थळावर आणतांना चालकांनी स्वत:बरोबरच समाजाची काळजी घेत रस्ते वाहतुकीचे सर्व नियम पाळावे, अपघात टाळण्यासाठी नेहमी सतर्क रहावे, ज्या चालकांनी अजुनही वाहन परवाने काढले नाही त्यांनी ते तात्काळ काढुन घ्यावे असे आवाहन श्रीरामपुर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. जी. पाटील यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपुर, कोपरगांव शहर व तालुका ग्रामिण पोलिस ठाणे, कोल्हे कारखाना त्याचप्रमाणे अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सहकार्याने मंगळवारी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावरील साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार सर्व उसतोडणी कामगार, ट्रॅक्टर, ट्रक, जुगाड, उस वाहतुकदार मालक, चालक, सहाय्यकांची व्यक्तीगत सुरक्षेची काळजी घेवुन त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवितात, अपघातात देखील सातत्याने मदत करतात. उस वाहतुकीसाठी आलेल्या सर्व वाहनांवर रिफक्लेटर, रेडीयमसह रात्रीच्या प्रकाशझोतात आवश्यक असणारे सर्व उपकरणे लावण्यांत आल्याचे सांगितले.
केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी उसतोडणी कामगारांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे सुचनेवरून कारखान्यांने अपघात विमा योजना उत्तरविल्याचे सांगत सुरक्षा अभियानांतर्गत संपुर्ण हंगामात वेळीच घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.