संगमनेर : पहाटेच्या सुमारास ५०० किलो गोमांस घेऊन जाणारी मारुती सुझुकी कंपनीची रिट्झ कार संगमनेर पोलिसांनी रायतेवाडी फाट्यावर पकडली. या कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेत कार चालक पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करत गोमांसासह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे पोलीस पथक काल गुरुवारी पहाटे ३.५० वाजेच्या सुमारास विविध वाहनांची तपासणी करत होते. यावेळी मारुती सुझुकी कंपनीच्या रिट्झ कार क्रमांक एम एच ०४ ई.डी २८९४ मध्ये मागील भागामध्ये सुमारे एक लाख रुपये किंमतीचे पाचशे किलो गोमांस आढळून आले, या कारवाई दरम्यान कारचालक मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी एक लाख रुपयांच्या गोमांसासह अडीच लाख रुपये किंमतीची कार असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संगमनेर उपविभागीय कार्यालयातील पो.कॉ अमृत शिवाजी आढाव यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील लोकसेवकाचे आदेशाचे उल्लंघन करून स्वतः वाहनांमध्ये वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस वाहतूक करताना मिळून आल्या प्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा रजि. नंबर १३७ /२०२३ भा.द.वि कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.ना धांडवड करत आहेत.