राष्ट्रसेवेची अनुभूती मालपाणी परिवारात :- स्वामी गोविंददेव गिरीजी

0

रामायण महानाट्याने डोळ्यांचे पारणे फेडले ; विविध सामाजिक संस्थांना ६ कोटीच्या देणग्या

संगमनेर : आपल्या अधिकारासाठी आपण रोजच  संघर्ष करतो, मात्र जेव्हा इतरांच्या अधिकारांची रक्षा हे आपल्याला कर्तव्य वाटू लागते त्यावेळी आपण विजयाच्या मार्गावर अग्रेसर होतो. मालपाणी परिवारात सामाजिक बांधिलकी व अनेक सदगुणांचे दर्शन पदोपदी होते. या परिवाराचे नेतृत्व करणारे राजेश मालपाणी स्वाध्यायशील उद्योगपती आहेत. त्यांच्या सानिध्यातून आपली ही दृष्टी अधिक व्यापक बनली आहे. अशा प्रकारचे अनमोल रत्न लाभणे ही संगमनेर व परिसरासाठी परमेश्वराची मोठी देणगीच असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रसंत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी सोमवारी काढले.

          उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जाणता राजा मैदानावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोमवारी ‘रामायण’ या महानाट्याच्या सादरीकरणाने समारोप झाला. यावेळी आशीर्वचन प्रदान करताना स्वामीजी बोलत होते. श्रीमती सुमनताई,ललितादेवी व सुवर्णा मालपाणी सह राजेश व संगीता मालपाणी यावेळी मंचावर उपस्थित होते.

          यावेळी स्वामीजींनी उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या जीवन चरित्रावर भाष्य करताना त्यांची विविध गुणवैशिष्ट्ये उपस्थितांसमोर विशद केली. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात मोठ्या पगाराची नोकरी मिळत असतानाही त्यांनी ‘जननी जन्मभूमिच्छ स्वर्गादपी गरीयसी’ या तत्त्वानुसार मायभूमीकडे धाव घेतली. मातृभूमीच्या सेवेत आपला समर्पित भाव कसा असावा, कशाप्रकारे माय भूमीची सेवा करावी हे अनुभवायचे असेल तर मालपाणी परिवाराकडे बघावं. तन मन आणि धनाने या परिवाराने संगमनेर व परिसराची सेवा केल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी नेहमी घरात प्रदीर्घ चर्चा करीत असत. त्यांच्या चर्चेचा विषय कधीही व्यक्तिगत नसे, ते सर्वदा परिवार आणि समाजाच्या कल्याणासह देशासाठी काय करता येईल, पुढच्या पिढीसाठी काय करता येईल यावर चिंतन करीत असत. त्याचा परिणाम त्यांच्या चिंतनातून आणि मातोश्री ललितादेवी यांच्या संस्कारातून मालपाणी परिवारात जन्मलेल्या सगळ्याच व्यक्ती प्रतिभा संपन्न घडल्या. राजेश मालपाणी यांचे संपूर्ण जीवन भगवद्गीते मधील अंतरंग योगमय असल्याचे सांगताना स्वामीजींनी केवळ जोरदार भाषण करता येणे, हिम्मत दाखवणे अथवा हजर जवाबी असल्याने कोणी यशस्वी होत नाही, तर त्यासाठी सतत प्रसन्नता आणि सौम्यताही आपल्या ठायी असण्याची गरज व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील नेता असो अथवा उद्योग विश्वातील नेतृत्व या दोघांनीही सर्वप्रथम आपल्या मनावर विजय मिळवण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना स्वामीजींनी ज्याने हे साध्य केले, त्याने जीवनात यश मिळवल्याचे महाभारतातील विविध दाखल्यांसह उपस्थितांना पटवून दिले. राजेश मालपाणी यांनी सौम्यता आणि निग्रह या गुणांमुळे सगळ्यांवर विजय मिळवला आणि त्यातूनच इतक्या मोठ्या परिवाराला कोणत्याही मतभेदाशिवाय विजयाचा निरंतर मार्ग दाखवल्याचे ते म्हणाले.वेगवेगळ्या गुणांनी भरलेल्या मालपाणी परिवारातील पाचही भावंडांना पाहिल्यानंतर त्या सर्वांना एका निष्ठेशी जोडून ठेवण्यासाठी महाभारतात ज्याप्रमाणे धर्मराजाने आपली भूमिका वठवली, त्याप्रमाणे राजेश मालपाणी यांची भूमिका ठळकपणे दिसून येत असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले. तुम्ही उत्तम नेतृत्व तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही लोकांचे सेवक म्हणून वावरत असतात, यावर अधिक प्रकाश टाकताना स्वामीजींनी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि रामायणातील हनुमानाची भूमिका सांगताना १९८८ पासून मालपाणी उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला नसल्याचा दाखलाही दिला.१७ फेब्रुवारीपासून जाणता राजा मैदानावर सुरू असलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याचा सोमवारी समारोप झाला. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांनी ‘रामायण’ हे महानाट्य सादर केले.महानाट्यात सहभागी झालेल्या प्रत्येक पात्राने वठवलेली भूूमिका, प्रत्येक भूमिकेला साजेशी वेशभूषा, नेमके संवाद, प्रकाश योजना.पार्श्व संगीत आणि नेपथ्य यातून साकारलेले श्रीराम जन्मापासून ते राज्यभिषेकापर्यंतचे विविध प्रसंग उपस्थित रसिकांना रामराज्याची अनुभूती देऊन गेले. राम कथेतील प्रत्येक प्रसंगानुरूप सादर झालेल्या एकाहून एक सरस नृत्य या महानाट्याने संगमनेरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

मालपाणी परिवाराचे सहा कोटी अकरा लाखाचे दातृत्व..!

उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या एकसष्ठीचे औचित्य साधून मालपाणी परिवाराने आपल्या दातृत्व शिलतेचा पुन्हा एकदा परिचय दिला. यावेळी संगमनेर- अकोले तालुक्याची शिक्षणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक संस्थेत व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण सुरू करण्यासाठी दीड कोटी, आळंदी येथील वेदश्री तपोवन या संस्थेला एक कोटी, मालपाणी उद्योग समूहाचा विस्तार असलेल्या वेगवेगळ्या अकरा ठिकाणच्या शाळासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एकूण दोन कोटी ७५ लाख, रोटरी नेत्र रुग्णालयाच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी २५ लाख व श्रीमद् भगवद्गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी गीता परिवाराला ६० लाख अशी एकूण सहा कोटी अकरा लाख रुपयांची देणगीही यावेळी जाहीर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here