राहुरी – ताहाराबाद रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी   

       राहुरी परिसरातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या संत महिपती महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित श्री पांडूरंग महोत्सव (गोपाळ काला) ची जय्यत तयारी सुरू असताना राहुरी ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था तसेच रस्त्यावर वाढलेले काटे व खड्यांचा अडसर दूर करण्यासाठी ताहाराबाद ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आ. प्राजक्त तनपुरे यांची भेट घेताच रस्त्याचे काम सुरू झाल्याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

           

ताहाराबाद येथे दि. २९ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात गोपाळ काला निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त लाखो भाविक भक्त हजेरी देत श्री पांडूरंग महोत्सवात सहभाग नोंदवितात. दरम्यान राहुरी ते ताहाराबाद रस्त्याचे काही महिन्यापूर्वीच काम झाले. परंतू पहिल्याच पावसात रस्त्यावरील खडी उघडी होऊन खड्डे तयार झाले. तसेच पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांमुळे साईडपट्या नष्ट झाल्या. रस्त्याची समस्या घेऊन ताहाराबादचे सरपंच निवृत्ती घनदाट, उपसरपंच बापुसाहेब जगताप व सदस्यांनी एकत्र येत रस्त्याची समस्या मांडली. आ. तनपुरे यांनी समस्या लक्षात घेताच तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. रस्त्याच्या कामाची तत्काळ दुरुस्ती तसेच नष्ट झालेल्या साईडपट्या व गटारीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. राहुरी परिसरात धार्मिकतेची पर्वणी असणार्‍या संत महिपती महाराज यांच्या गोपाल कालासाठी लाखो भाविक भक्त येतात. त्यांना प्रवासासाठी कोणताही त्रास होऊ नये, रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे असे आ.तनपुरे यांनी आदेश दिले.

          आ. तनपुरे यांनी आदेश देताच बांधकाम प्रशासन नियुक्त ठेकेदाराडून रस्ता दुरूस्ती तसेच साईडपट्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राहुरी ते ताहाराबाद रस्त्याची दुरूस्ती होत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आ.तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here