बाजार समिती जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला ,रणधुमाळी बाजार समिती निवडणुक
देवळाली प्रवरा, राजेंद्र उंडे :
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय ‘डफ’ घुमू लागला असून, बाजार समितीमध्ये राजकीय समीकरण जुळविताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेची तयारी दोन्ही बाजुने सुरू आहे. तनपुरे गटासह विखे-कर्डिले गटाने एकमेकांना शह देण्यासाठी केलेल्या
व्यूवहरचना पाहता आगामी लोकसभा, विधानसभेची रंगीत तालीमच रंगणार असल्याचे चित्र सध्या राहुरीत आहे. खासदार डॉ. सुजय विखेंना लढा देण्यासाठी विरोधी उमेदवार कोण?, अशी चर्चा एकीकडे होताना आमदार नीलेश लंके यांच्या वाढलेल्या
राहुरी वारीने लोकसभा निवडणूक चर्चेला खमंग फोडणीचा वास घुमू लागाला आहे.तर डाँ.तनपुरे कारखान्याच्या माध्यमातुन खा.डाँ.विखे यांनी राहुरीवर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.विखे यांनी तालुक्यात आपली पालेमुळे रोवली असुन डाँ.तनपुरे कारखान्या बरोबारच तालुका पंचायत समिती,नगर पालिका,ग्रामपंचायती व शालीनीताई विखे यांना आमदार करण्यासाठी राहुरी विधानसभेची जागा सुरळीत करण्यासाठी बाजार समितीच्या आडुन आमदारकीच्या निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या राहुरी तालुक्यात सत्तास्थापणेसाठी उत्तर व दक्षिणेतून मोठे प्रयत्न सुरू आहेत. राहुरीचे स्थानिक असलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांना रोखण्यासाठी तनपुरेंना दक्षिणेतून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, तर उत्तरेतून खासदार डॉ. सुजय विखेंचे कडवे आव्हान असणार आहे. राजकीय नेत्यांनी एकप्रकारे विधानसभा व लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केल्याचे चिञ आहे.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता कोणत्याही परिस्थितीत मिळवायची असा चंग बांधत राजकीय नेत्यांच्या गुप्त बैठकांच्या चर्चा गावापातळीवर चांगल्याच रंगू लागल्या आहेत. बैठकीत बाजार समितीची चर्चा होताना खासदार डॉ. विखेंकडून राहुरीचे भावी आमदार कर्डिलेच असतील, तर स्वतः कर्डिलेंकडून आपले फिक्स खासदार विखेच असतील असा दावा केला जात आहे. त्यामुळेच दोघेही एकमेकांना साद-प्रतिसाद देताना दिसत आहेत.
खा.डाँ.सुजय विखे यांचे यात छुपे राजकारण हि सामिल आहे.माजी. आ.शिवाजीराव कर्डीले यांनाजिल्हा बँकेचे चेअरमन करुन मागिल दाराने विधान सभेत पाठविण्याचा प्रयत्न सुरु आहे.कर्डीले यांना विधान सभेत पाठविल्या नंतर राहुरीची विधानसभेची जागा मोकळी होती.या जागेवर जिल्हा परीषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांना निवडणुकीत उतविण्याचा प्रयत्न विखे पिता पुञाचा आसला तरी अद्याप जाहिर केला नाही.तालुक्यावर पकड मिळवुन नंतर स्वतःच्या फायद्याचे राजकारण केले जाण्याची शक्यता आहे.
कर्डिलेंचे कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम
माजी आमदार कर्डिलेंनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर गावागावामध्ये लक्ष देत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे बाजार समितीची निवडणूक असो की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेसह तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तनपुरे विरोधात विखे-कर्डिले यांनी जोडी वर्चस्व पणाला लावत आपली ताकद दाखविणार असल्याचे चित्र आहे.
आमदार तनपुरेंनीही ठोकला शड्डू!
राष्ट्रवादीचे आमदार तनपुरेंनीही विरोधकांना सडेतोड उत्तरे देत आगामी निवडणुकांसाठी राजकीय शड्डू ठोकला आहे. त्यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून जनतेमध्ये आपलीच हवा असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मागील महाविकास आघाडी शासन काळात केलेल्या कोट्यवधींची विकास कामे, तसेच जनसामन्यांमध्ये मिसळत आमदार तनपुरेंनी सर्वसामान्यांचा आमदार असल्याचे दाखवून दिले आहे.विकास कामातुन आ.तनपुरे यांनी तालुक्यातुन जनतेच्या पसंतीला उतरण्याचा प्रयत्न सुरु आहेत.तालुक्यातील प्रथमच तरुण आमदार व तरुण मंञी होण्याचा मान आ.प्राजक्त तनपुरे यांना मिळाला आहे.
विखेंची यंत्रणा जोमात
राज्यात सत्ता बदल होताच राहुरीत विखेंनी यंत्रणेवर अंकूश मिळविला आहे. राहुरी परिसरात विखेंची यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. विखे समर्थकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. विखे यांची प्रशासकीय नियोजन जोमात सुरू आहे.विखे यंत्रणेच्या माध्यमातून महसूल, पोलिस, नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी, पशू, आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावली जात आहेत.कार्यकर्त्यांच्या बैठकांवर विखेंनी जोर दिला आहे.
आमदार नीलेश लंकेंच्या राहुरीत वाऱ्या वाढल्या!
विधानसभेसाठी तनपुरे कर्डिले यांच्यात सरळ लढत होईल असे चित्र निर्माण होत असताना लोकसभेसाठी चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे पॉप्यूलर आमदार नीलेश लंके यांनीही पारनेरसह राहुरीत चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. राहुरीत आमदार लंके यांनी चांगलीच कार्यकर्त्यांची टिम तयार केल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार लंकेंची तयारी राहुरीतून जोमात असल्याच्या चर्चा पारावर रंगत आहेत. आमदार लंकेंनी राहुरी हद्दीत अनेक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांची आपले हितसंबंध जोपासत विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती देत लोकसभा निवडणुकीला उमेदवारी करण्याच्या चर्चेला फोडणी दिली. राहुरीत राजकीय धुरळा चांगलाच उडाल्याचे चित्र आहे. राजकीय डफडे वाजत असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या इच्छुकांनी राजकीय नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी विविध क्लूप्त्या आखल्या आहेत. विविध विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेले प्रयत्नाने राजकीय आरोपांची धुळवड सुरू असताना विधानसभा व लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाल्याचे बोलले जाते. –