संगमनेर : शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याच्या कारणावरून तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक असणाऱ्या भागवतवाडीत राहणाऱ्या एका तरुणावर संगमनेर तालुका पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळेत जाता-येता झालेल्या ओळखीचा फायदा घेत भागवतवाडी येथे राहणाऱ्या सागर दत्तू भागवत या तरुणाने अल्पवयीन १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्या माध्यमातून तिच्याशी संभाषण साधण्यास व वेगवेगळे मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. त्यातून या दोघांमध्ये काहीशी जवळीक निर्माण झाल्यानंतर सागर भागवत याने माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगत त्या अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून भेटावयास बोलावले. यावेळी ही मुलगी परिसरात बंद अवस्थेत असणाऱ्या सर्विस सेंटर मध्ये पोहचली. तेथे सागर भागवत याने त्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे अनेकदा अत्याचार केल्यानंतर सागर भागवत याने सदर मुलीला एक दिवस संगमनेरला नेऊन एका औषध दुकानातून गर्भपाताच्या गोळ्या आणून त्या खाऊ घातल्या. त्यानंतर चार-पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी सदर अल्पवयीन मुलीला सागर भागवत याने पुन्हा मोबाईलवर मेसेज टाकून बोलावून घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यानंतर ही मुलगी घरी जात असताना तिच्या वडिलांनी तिला पाहून चौकशी केली असता गेल्या सात महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यानंतर या अल्पवयीन पीडित मुलीने तालुका पोलीस ठाण्यात सागर दत्तू भागवत या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यातील आरोपी सागर भागवत हा राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रावर कार्यरत असल्याचे समजते.