विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते प्रकाशन

0

माध्यमांना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त- मुख्य सचिव

शिर्डी, दि. १९ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आले. माध्यम प्रतिनिधींना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त असल्याचे श्रीमती सौनिक यावेळी म्हणाल्या.

याप्रसंगी महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.

आहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाने माध्यम प्रतिनिधींच्या सुलभ संदर्भासाठी  या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्डस् ऑथॉरिटीच्या (एनबीडीएसए) मार्गदर्शक सूचना, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची (आयएमएआय) स्वैच्छिक आचारसंहिता आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे.

 राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज (एमसीएमसी), पेड न्यूजबाबत तरतुदी आदी उपयुक्त माहितीही या पुस्तिकेत आहे.

सन १९५१ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवार त्यांना झालेले मतदान, मतदार संख्या, वैध मतांची संख्या, मतदानाची टक्केवारी यांचाही पुस्तिकेत समावेश असल्याने ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधींना संदर्भासाठी उपयुक्त आहे.

माध्यमांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचे समन्वय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, मतदार मदत कक्ष, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक, आयोगाच्या विविध तंत्रज्ञान सहाय्यित उपयोजक (ॲप), पोर्टल आदींची माहितीही यात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here