विसर्जन मिरवणुकीत आ. आशुतोष काळेंचा सपत्नीक ढोल बजावत दिला लाडक्या बाप्पाला निरोप

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरासह मतदार संघात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देवून या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सपत्नीक सहभागी होवून ढोल बजावत लाडक्या बाप्पाला निरोप देवून गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. कोपरगाव मतदार संघातील जनतेला सुखी ठेवून मतदार संघाच्या विकासासाठी बाप्पा तुझे आशीर्वाद पाठीशी राहू दे अशी प्रार्थना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी श्री गणेशाच्या चरणी केली.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, विविध सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अधोरेखित होत असून शिवजयंती, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र हे उत्सव राज्यात मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव हा भारतातील महत्वाचा प्रमुख आणि भव्यपणे साजरा केला जाणारा सण आहे.दहा दिवस श्री गणेशाची नियमितपणे आरती व विधिवत पूजा-अर्चा करून विसर्जनाच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लहान थोरापासून गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात बाप्पाकडून पुढच्या वर्षी येण्याचे वचन घेवून बाप्पाला निरोप देतात. बाप्पाला निरोप देतांना भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असला तरी हा प्रसंग गणेश भक्तांसाठी काहीसा भावनिक असतो व यावेळी नकळत डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाही.

कोपरगाव शहरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गणेश भक्तांच्या जयघोषामुळे वातावरण भक्ती आणि उत्साहाने भरून गेले होते. सर्व गणेश भक्तांनी आपला उत्साह जपतांना मिरवणूक कायदा व सुव्यस्थेचे काटेकोरपणे पालन करून शांततेत गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.

ढोल ताशा हा सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा अविभाज्य भाग आहे.पुणे-मुंबई या शहराप्रमाणे प्रत्येक शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला ढोल ताशा पथक सहभागी होत असतात. ढोल-ताशांच्या तालावर नाचत, गात गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप देण्यासाठी असंख्य गणेश भक्तांच्या समवेत ढोल बजावण्याचा आनंद मनाला आतिशय समाधान देणारा होता अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here