संगमनेर : तालुक्यातील रहिमपूर येथील श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेचा अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, या संस्थेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज बुधवार पासून सुरुवात होणार असून ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
तालुक्यात सहकार क्षेत्रात एकेकाळी अग्रगण्य असणाऱ्या या दूध संस्थेची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक दूध संस्था व खाजगी दूध संकलन केंद्र गावात झाल्याने श्रीकृष्ण दूध संस्थेचे अनेक दूध उत्पादक सभासद इतर ठिकाणी दूध टाकत आहेत. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे सध्या तरी श्रीकृष्ण दूध संस्था कशीबशी सुरू आहे. अशातच गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आज बुधवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत संस्थेच्या रहिमपूर येथील कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री करण्याचा कार्यक्रम असून आजपासूनच उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा करता येणार आहेत त्यासाठी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ असेल, तसेच ३ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दिनांक ३ जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ४ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. दि.२० जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, त्यानंतर २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप करण्यात येईल. आणि ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर लगेचच दुपारी ३.३० पासून मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी गाढे काम पाहणार आहेत.