संगमनेर : मूळचा अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रहिवासी असणारा मात्र संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या बहुचर्चित संकेत नवले खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सलमान आणि शाहरुखला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.
संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संकेत नवले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. गतवर्षी ८ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा मृतदेह संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावर असलेल्या पुनर्वसन कॉलनी जवळील एका नाल्यात आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी संकेत नवले खून प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास शहर पोलीस, पोलीस उपाधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोले पोलीस आदी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक करत होते. या घटनेला तब्बल दोन महिने होत आले होते तरी या गुन्ह्यात पोलिसांना फारसे हाती काही लागले नव्हते, मात्र संकेत नवले हा वापरत असलेल्या समलैंगिक संबंधा बाबतच्या मोबाईल ॲपच्या आधारे पोलिसांनी तपास करत असाच ॲप वापरत असलेल्या पुनर्वसन कॉलनी मधील शाहरुख आणि सलमानची चौकशी केली आणि ८ फेब्रुवारी २०२३ रोजी शहर पोलिसांनी संकेत नवले याच्या खून प्रकरणी या दोघांना अटक केली होती. दरम्यान शाहरुख आणि सलमानने जामीनासाठी अॅड शरीफ पठाण यांच्यामार्फत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अॅड पठाण यांनी न्यायालयासमोर पोलिसांच्या तपासा संदर्भात आणि कार्यपद्धतीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले, तसेच आरोपी निर्दोष असल्याचा युक्तिवाद करताना चोर सोडून संन्याशाला फाशी अशा पद्धतीने पोलीस तपास असल्याचे म्हटले. दोन्ही आरोपी विरोधात असलेला पुरावा कुमकुवत असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. पोलीस तपासातील त्रुटी वर बोट ठेवत तसेच खून करणारे आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आरोपीच्या नातेवाईकांनी अॅड शरीफ पठाण व अॅड मोहसीन खान यांचे आभार मानले.